कोपरगाव - कोपरगाव शहरातील प्रभागात आज करण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ, मैला, शेवाळ युक्त, गटारीचे ड्रेनेजचे काळे पाणी, अतिश
कोपरगाव – कोपरगाव शहरातील प्रभागात आज करण्यात आलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतिशय गढूळ, मैला, शेवाळ युक्त, गटारीचे ड्रेनेजचे काळे पाणी, अतिशय घाण वास येत असलेला केल्याने पालिका प्रशासन विरोधात नागरिक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासक असल्याने कोणाचाच कोणावर वचक नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, याकडे कुणीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
शहरातील विविध प्रभागात सर्वच ठिकाणी अतिशय गाळयुक्त काळे पाणी वितरित करण्यात आले, आधीच शहरात मोठ्या प्रमाणावर डासांनी उच्छाद मांडलेला असताना गढूळ दूषित पाणीपुरवठा करण्यात येऊन नागरिकांचा अंत पाहण्यात आला आहे, त्यामुळे अतिसार, डेंग्यू, कावीळ, थंडी ताप, सर्दी, पडसे खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येणारी साफसफाई ठिकठिकाणी साचलेले कचर्याचे ढीग तुंबलेल्या गटारी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका सध्या आठ दिवसात पाणीपुरवठा करीत आहे त्यामुळे वर्षाकाठी केवळ 48 दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो व पाणीपट्टी संपूर्ण वर्षाची घेतली जाते या गंभीर समस्ये कडे ना कोणी लक्ष देत ना कोणी आवाज उठवताना दिसत आहे. असे मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.
प्रशासक म्हणून मुख्याधिकारी शांताराम गोसावी सध्या काम पाहत आहेत, त्यांच्याकडे तक्रारींचा मोठा साठा साचला असून त्याचा निपटारा होत नसल्याने व शहरातील कामे अतिशय संथ गतीने होताना दिसत आहेत, ना मुख्याधिकारी कोणत्या प्रभागात भेट देत अथवा असलेल्या समस्यांचा करीत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, ना मुख्याधिकार्यांवर कोणाचा वचक, ना मुख्याधिकार्यांचा कामगारांवर वचक.. अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे, तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर कामे करण्यात धन्यता मानली जात आहे. वर्षानुवर्ष हा प्रश्न सातत्याने सतवत आहे, पालिकेच्या माध्यमातून झालेले कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहेत याबाबत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील तसेच सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. कोपरगावला धुळीचे साम्राज्य हे कायमचे पाचवीला पुजलेले पुजलेले आहे. आता या प्रश्नावरून गांधीनगर भागातील नागरिक महिला पालखी समोर उपोषणास बसणार आहेत, तर गुरु शुक्राचार्य यांचे जगातले मंदिर बेट भागात आहे तेथे आता पर्यटनाला चांगला भाव आहे, मात्र तेथील रस्ते गटारी, स्वच्छता यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .तेथील नागरिकांनी तसेच ट्रस्टच्या वतीने अनेकदा निवेदनही दिली त्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे स्वच्छता, चांगले पिण्याचे पाणी याकडे मात्र मोठ्या प्रमाणावर सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे हे कोपरगावकरांचे दुर्दैव आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्या अनेक ठिकाणी फुटलेले आहे त्यात गटाराचे पाणी राजरोजपणे मिसळत असतानाही हजारो रुपये खर्च दुरुस्तीकडे दाखवला जातो मात्र समस्या जैसे थे आहे.
COMMENTS