मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी गुरूवारी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असलेल्या योगेश सावंत नाम
मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी गुरूवारी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असलेल्या योगेश सावंत नामक तरूणाला गुरूवारी अटक करण्यात आली आहे. योगेश सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या अटकेवरून विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांत तीव्र शाब्दिक चकमक उडाली. योगेश सावंतवर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानास्पद भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याच्या धमकीची पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम 153(अ), 500, 505(3), 506(2) व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी भाजप आमदार राम कदम यांनी योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत त्यात देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू’. याचे नाव आहे योगेश सावंत. याचे सबंध बारामतीहून आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध आहे रोहित पवारचा? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
नेमके काय घडले – मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया घेणारा एक व्हिडिओ तथाकथित गावरान नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झाला. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ब्राह्मण समाजाला संपवण्याचे वक्तव्य केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एकेरी वक्तव्य करत त्यांच्यावर टीका केली. योगेश सावंतने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. पण पोलिसांनी हा व्हिडिओ टाकणार्या चॅनेलवर कारवाई करण्यापूर्वीच योगेश सावंतला अटक केली. आता त्याच्या अटकेचे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटत आहेत.
योगेश सावंत आमचा कार्यकर्ता ः रोहित पवार – आमदार रोहित पवारांनी याप्रकरणी बोलतांना म्हणाले की, पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणले होते. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहेत. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधार्यांनी तिथे अॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय ना, तो आमचा कार्यकर्ता आहे, असे रोहित पवार म्हणाले. त्याने काय चूक केली? कुठल्यातरी यूट्यूब चॅनलने एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली होती. ती फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवर टाकली होती. तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही. जो पत्रकार तिथे होता, त्यानं परवानगी घेऊन मुलाखत घेतली किंवा नाही यावर मी काही बोलणार नसल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.
COMMENTS