कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : शेख यांची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : शेख यांची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर मनपाचे दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक क

अधीक्षक अभियंता राजभोज यांच्या कार्यकाळात नाशिक सा. बा. मंडळ बनले भ्रष्टाचाराचे केंद्र l Lok News24
अकोले तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर मनपाचे दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे. दरम्यान, गिरवले मृत्यू प्रकरण अतिशय गंभीर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे, असा आरोपही शेख यांनी घेतला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना गिरवले यांच्या मृत्यूची घटना सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी घडली आहे व याप्रकरणी सीआयडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्कालीन दोन पोलिसांसह अन्य काहींवर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेख यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पुणे येथील ससून रुग्णालयातील कोणकोणते डॉक्टर व कर्मचार्‍याच्या संपर्कात होते, न्यायालयीन चौकशी सुरू असताना तिथे कोणाच्या संपर्कात होते याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने घ्यावी व या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधीची जबाबदारी
शेख यांनी म्हटले की, गिरवले मारहाणप्रकरणी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला(सीआयडी) तब्बल अडीच वर्षे लागले. याप्रकरणी गिरवले कुटुंबीयांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यामध्ये न्यायालयाने वेळोवेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला विचारणा करून संबंधित दोषी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांवर फौजदारी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना त्याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला अपयश आलेले आहे. त्यामुळे गिरवले कुटुंब न्यायापासून वंचित आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांना आरोपी करण्यात आलेले नाही. जामीनपात्र साधा गुन्हा दाखल करून अडीच वर्षात जो काही तपास केला, त्या अनुषंगाने कलम 324 सारखा गुन्हा दाखल करून मोठी कामगिरी केल्याचे दाखविले आहे, पण ते योग्य नाही. नगर शहराच्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात या घटनेप्रकरणी तात्काळ कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणे आवश्यक असताना, त्यांच्याकडूनही कुठलाही प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. ज्या लोकप्रतिनिधीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचारी-अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी ताब्यात घेतले म्हणून व त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नगरसेवक या नात्याने कैलास गिरवले हेसुद्धा गेले होते. त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यामध्ये गिरवले यांना अटक करताना झालेल्या गंभीर मारहाणीत त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे, असा दावाही शेख यांनी केला आहे. याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे ही घटना घडल्यानंतर लेखी तक्रार केली आहे. परंतु आयोगाने सुद्धा त्या प्रकरणी तत्परता दाखवली नाही. कैलास गिरवले मारहाण प्रकरणात त्यावेळच्या पोलीस अधिकार्‍यांनाही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपी करावे व अदखलपात्र गुन्हा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये रूपांतर करावा. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात ज्या ठिकाणी गिरवले यांना मारहाण झालेली आहे, त्याच्या सीसीटीव्ही फुटेजचे अवलोकन करून कलम 302 प्रमाणे या गुन्ह्यात वाढ करण्यात यावी, असे शेख यांनी म्हटले आहे.

COMMENTS