अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब बोठे पाटील याची रवानगी आता नाशि
अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब बोठे पाटील याची रवानगी आता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पारनेर येथील उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाल्याने येथील दहा आरोपींना नाशिकला व अन्य दहा जणांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. यातील नाशिकला हलवलेल्या आरोपींमध्ये पत्रकार बोठेचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. पारनेरच्या कारागृहाची क्षमता 24 आहे. सध्या तेथे 70 आरोपी आहेत. त्यातील 20 आरोपी हलविल्यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 50 आरोपी तेथे राहणार आहेत. जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे कारागृहात आहे. त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. तसेच कोतवाली पोलिसांत दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातही त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. आता त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
COMMENTS