Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्याचे पोलिस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

लाठीचार्जनंतर गृहमंत्रालयाने केली कारवाई

जालना/प्रतिनिधी ः जालन्यात मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. प

‘मत’पेरणीचा महायुतीचा संकल्प !
जागतिक हिवताप दिन व जागतिक मलेरिया दिन येथील उपकेंद्र झाला संपन्न
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या की घातपात ?

जालना/प्रतिनिधी ः जालन्यात मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशामुळेच हा लाठीमार करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  आंदोलन शांततेत सुरू होतं. पण अचानक आदेश आला आणि लाठीमार करण्यात आला, असे आंदोलकांचे म्हणणे होते. त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. राज्य सरकारने तीन दिवसानंतर पोलीस अधीक्षकावर कारवाई केल्याने मराठा समाजातून त्याचं स्वागत होत आहे. पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतरही कारवाई करण्यासाठी तीन दिवस का लागले? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. तसेच अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचे काय? असा सवाल करतानाच आमच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. आंतरवाली गावात शुक्रवारी दुपारी 250 पोलिस आंदोलनस्थळी आले. त्यांनी सोबत आणलेल्या डॉक्टरांकडून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची रक्त तपासणी केली. आमचे काम संपले आहे, आता आम्ही माघारी जातो, असे म्हणत उपस्थितांना बेसावध केले. नंतर अवघ्या पाच मिनिटांनी पोलिसांनी साखळी केली. विनवणी करणार्‍या स्वयंसेवकांना चिमटे तसेच पोटात बुक्के मारायला सुरुवात केली. गर्दी करून धक्काबुक्की करत पोलिसांनी थेट लाठीमार सुरू केला. महिलांनाही मारहाण केली. यामुळे चिडलेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रतिकार करण्यासाठी दगडफेक केली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलिसांच्या लाठीमारात 250 हून जास्त आंदोलक जखमी झाले. काहींना छर्रे, अश्रुधुराच्या नळकांड्यांमुळे मोठी दुखापत झाली. त्यांच्यावर अंबड ग्रामीण रुग्णालय, खासगी व वडीगोद्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. संतप्त मराठा तरुणांनी काही ठिकाणी एसटी बससेची जाळपोळ व तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. राज्यात एकूण 19 एसटी बसेसचे यामुळे नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे.

गृहखात्यावर अजितदादांची नाराजी? – राज्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतांना, उपमुख्यमंत्री अजित पवार गृहखात्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी अजित पवारांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्याची गरज होती का? असा सवाल अजितदादा गटाकडून केला जात आहे. तसेच आपण मराठा समाजासोबत आहोत, असंही अजितदादा गटाचे म्हणणे आहे. तसेच अजितदादा नाराज असल्यानेच त्यांनी पिंपरीतील कार्यक्रमाला जाणे टाळले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार्‍या बुलडाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमालाही जाणे टाळल्याचे सांगितले जात आहे. 

COMMENTS