Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इर्शाळवाडीसाठी ठरली ती काळरात्र

झोपेतच संपूर्ण गाव दबले ढिगार्‍याखाली ; 16 जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावासाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. संपूर्ण गाव जेवण करून उद्याची पहाट उजाड

इर्शाळवाडीच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग
इर्शाळवाडीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांची संख्या 29 वर

मुंबई/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावासाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. संपूर्ण गाव जेवण करून उद्याची पहाट उजाडण्यासाठी झोपी गेले, मात्र रात्री साडेदहा वाजता दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगार्‍याखाली दबले गेले. यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही या ढिगार्‍याखाली दबलेले आहेत. घटनास्थळी जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने पोकलेन नेता येत नाही, तसेच सतत पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात विधानसभेत निवेदन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इरशाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावर इरशाळगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागत आहे. या वाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. गेल्या 3 दिवसांत (दि. 17 जुलै ते 19 जुलै) 499 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री 10.30 ते 11.00 या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. या घटनेची 11.30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. रात्री 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षास माहिती मिळाली. इर्शाळवाडी ही चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगरदरीत वसलेली लहानशी वाडी आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळणवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. दूरध्वनी/मोबाईलने संपर्क साधणे ही कठीण होत आहे. प्रामुख्याने ठाकर आदिवासी समाज या वाडीत राहतात. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी या ठिकाणी दरड कोसळणे, भूस्ख्लन होणे, अशा प्रकरच्या घटना घडलेल्या नाहीत. इर्शाळवाडीत 48 कुटुंब (228 लोकसंख्या) वास्तव्यात होती. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब बाधित झालेली आहेत. 228 पैकी 70 नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे व 21 जखमी असून त्यापैकी 17 लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले असून 6 लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी 10.15 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे. त्या भागातील माती, दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक गिर्यारोहक तरुण आणि एनडीआरफ जवान व सिडकोने पाठविलेले मजूर यांच्यामार्फत कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, ईशाळवाडी गावामध्ये 48 घरे आहेत. रात्रीचे जेवण करून ही कुटुंबे झोपी गेली, आणि तेच रात्री साडेदहा वाजता दरड कोसळली, यातून अनेक कुटुंबे ढिगार्‍याखाली दबली गेली, तर अनेक कुटुंबांनी ढिगार्‍याखाली दबलेल्या आपल्या लेकरांना माती दूर करून बाहेर काढले. यात 100 हून अधिक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मात्र, पाऊस, धुके आणि चिखलामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. इर्शाळवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. पावसामुळे जी पायवाट आहे, ती पूर्ण चिखलात गेली आहे. बचावपथकांनाही पायीच तेथे जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाहीये. त्यामुळे बचाव पथकाचे सदस्य अक्षरश: हातानेच ढिगारे उपसत आहेत. तसेच, गावात मदतीसाठी जात असतानाही एका जवानाचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळून जखमी झालेल्यांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना आदिती तटकरे यांना दिल्या आहेत. मदतीसाठी इर्शाळवाडी गावातच पोलिस कंट्रोल रुम बनवण्यात आले आहे. मदतीसाठी 8108195554 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

ग्रामस्थांनी सांगितली थरकाप उडवणारी आपबीती – ईशाळवाडी गाव 48 उंबरठा असलेले गाव. रात्रीचे जेवण करून संपूर्ण गाव झोपी गेले. मात्र रात्री साडे दहा वाजता दरड कोसळून सर्व घरे ढिगार्‍याखाली दबली गेली. थरकाप उडवणारी आपबीती ग्रामस्थांनी कथन केली. एका महिलेने सांगितले की, आम्ही गाढ झोपेत होतो त्यावेळी अचानक आवाज आला, त्यावेळी आमच्या अंगावरही काही प्रमाणात मातीचा ढिग पडल्याचे आम्हाला जाणवले. आमची लेकरं ढिगार्‍याखाली दबल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढले आणि घरातून बाहेर पडत खालच्या दिशेने पळालो, त्यामुळे बचावलो.

झाडे उन्मळून पडली – याबद्दल थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला. या प्रकरणी एका व्यक्तीने सांगितले की आमचे घर खचल्याने आम्हाला जाग आली, आम्ही बाहेर येऊन पाहतो तर आजूबाजूचे सर्व घरे खचलेली दिसून आली तर मोठी झाडे उन्मळून पडलेली दिसले, तर अनेक कुटुंबे ढिगार्‍याखाली दबले गेले होते.

घरे ढिगार्‍याखाली दबली गेली – आम्ही सर्वजण झोपेत असताना हा प्रकार घडला, त्यामुळे कसे झाले हे काहीच आम्हाला कळले नाही, एक मोठा आवाज झाल्याने आम्हाला जाग आली यावेळी आमच्यावर मातीचा ढिग असल्याचे लक्षात आले. मग भाऊ आणि वहिनीने दोन मुले ढिगार्‍याखाली दबली गेली होती. मग आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढले आणि घरातून बाहेर पळालो. आमच्या बाजूची सर्व घरे ही ढिगार्‍याखाली दबली होती, असे दुर्घटनेतून वाचलेल्या एका महिलेने सांगितले.

मदतीसाठी जाताना जवानाचा मृत्यू – रात्री 10.30 ते 11 सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. तसेच, गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचावपथकाला अक्षरश: पायी चिखल तुडवून गावापर्यंत जावे लागत आहेत. त्यामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आले होते. तसेच, रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची समोर आले आहे.

75 जणांना बाहेर काढण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन करतांना म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.

दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप – रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट- दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. असे असले तरी पाऊस थोडासा उघडल्यावर तातडीने हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत म्हटले आहे की, एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत.

COMMENTS