भाळवणी/प्रतिनिधी ः आदर्श गाव हिवरे बाजार येथे 12 मे रोजी सकाळी ठीक 7 ते 9 या वेळेत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णमहोत्सवी म
भाळवणी/प्रतिनिधी ः आदर्श गाव हिवरे बाजार येथे 12 मे रोजी सकाळी ठीक 7 ते 9 या वेळेत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आलेले होते. हिवरे बाजार येथील 51 वर्षापूर्वी सन 1972 च्या दुष्काळात तयार केलेल्या पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले की, तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला.
श्रमदानात ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळ व विद्यार्थी तसेच महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. हिवरे बाजार येथील श्रमदानाचे इतर गावांनी अवलोकन केले तर इतरही गावे पाणीदार व स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. श्रमदानासारख्या उपक्र्मातून गावागावात एकोपा निर्माण होऊन विविध विकास कामे गुणवत्तादायी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार 2.0 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रकारची जलसंधारणाची कामे हि हिवरे बाजार धर्तीवर करण्यात येतील.
सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आशिष येरेकर, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद पाडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपअभियंता डी.के. ठुबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले तसेच हिवरे बाजार येथील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळ तसेच विद्यार्थी व महिला तसेच राज्याच्या आदर्श गाव योजनेतील गावातून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामकार्यकर्ता, संस्था अध्यक्ष, संस्थेचा तांत्रिक कार्यकर्ता, कृषी पर्यवेक्षक, महिला पदाधिकारी, महिला बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका हे सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी बोलताना सांगितले की श्रमशक्तीतून काय साकार होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिवरे बाजार गाव आहे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून हिवरे बाजार सारखी गावे महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करत आहे. हिवरे बाजारचे ग्रामविकासाचे मॉडेल इतर गावात राबविल्यास गावे लवकरच सुजलाम सुफलाम होतील असेही त्यांनी सांगितले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी पुढे बोलताना सांगितले, गावकर्यांना दुष्काळात जगविण्यासाठी पाझर तलावाचे काम करण्यात आले. हिवरे बाजार येथील संदीप गुलाब ठाणगे यांचा शुभविवाह होता परंतु नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदान केले मगच लग्नविधी पार पडला.
COMMENTS