Homeताज्या बातम्यादेश

इस्रोच्या ‘अन्वेषा’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षमतेला महत्वपूर्ण बळअमरावती : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) आणि सं

इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी
इस्त्रोचा नवा विक्रम
आकाशाला गवसणी घालण्याची संधी : नांदेडच्या 10 विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ अभ्यास दौर्यासाठी निवड

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षमतेला महत्वपूर्ण बळ
अमरावती : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आणखी एक महत्त्वपूर्ण अंतरिक्ष मोहीम यशस्वीपणे पार पडली. पीएसएलव्ही-सी62/ईओएस-एन1 या मोहिमेअंतर्गत ‘अन्वेषा’ या अत्याधुनिक निगराणी उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणामुळे भारताच्या अंतरिक्ष संशोधनासोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षमतेला महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे.
सोमवारी सकाळी 10.18 वाजता उड्डाण घेतलेल्या पीएसएलव्हीच्या 64व्या मोहिमेत एकूण 15 उपग्रहांचा समावेश होता. यामध्ये ‘अन्वेषा’ हा उपग्रह सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात आहे. हा उपग्रह उच्च दर्जाच्या प्रतिमा टिपणार्‍या सेन्सर्सने सुसज्ज असून भूपृष्ठावरील सूक्ष्म हालचाली, भौगोलिक बदल आणि संवेदनशील ठिकाणांवरील घडामोडींचे अचूक निरीक्षण करण्याची क्षमता त्याच्यात आहे. ‘अन्वेषा’ उपग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेली हायपरस्पेक्ट्रल तंत्रज्ञान प्रणाली. पारंपरिक उपग्रह केवळ दृश्य स्वरूपातील प्रतिमा टिपतात; मात्र हायपरस्पेक्ट्रल सेन्सर प्रकाशाच्या विविध आणि अतिशय सूक्ष्म तरंगलांबींचे विश्‍लेषण करू शकतात. त्यामुळे मानवी डोळ्यांना न दिसणारी माहितीही संकलित करणे शक्य होते. जंगलांच्या दाट भागातील हालचाली, सीमावर्ती भागांतील बदल किंवा अत्यंत लहान वस्तूंची ओळख पटवण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक अचूक, वेगवान आणि विश्‍वासार्ह माहिती मिळणार आहे. सीमासुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, गुप्तचर यंत्रणा तसेच भविष्यातील युद्धतंत्र यामध्ये या उपग्रहाचा मोठा उपयोग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रक्षेपणाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय खासगी अंतरिक्ष क्षेत्राचा वाढता सहभाग. उपग्रह निर्मिती, तांत्रिक सहकार्य आणि विविध प्रणालींच्या विकासात खासगी कंपन्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे देशातील अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षेत्र अधिक व्यापक होत असून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

भविष्यातील संशोधन, सुरक्षेला मिळणार गती
पीएसएलव्ही-सी62 रॉकेटद्वारे ‘अन्वेषा’सह इतर उपग्रहांना सूर्य-तुल्यकालिक कक्षेत स्थापित करण्यात येत आहे. या कक्षेमुळे कोणत्याही हवामानात सातत्यपूर्ण आणि अचूक माहिती मिळणे शक्य होते. यामुळे निरीक्षण क्षमता अधिक प्रभावी बनणार आहे. एकूणच, इस्रो आणि डीआरडीओच्या समन्वयातून साकार झालेली ही मोहीम भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे आणि तांत्रिक सामर्थ्याचे प्रतीक ठरली आहे. श्रीहरिकोटाच्या भूमीवरून पुन्हा एकदा भारताने जागतिक पातळीवर आपली अंतरिक्ष क्षमता अधोरेखित केली असून भविष्यातील संशोधन, सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

COMMENTS