कृषी निर्यातीत वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी निर्यातीत वाढ

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र देशाच्या जीडीपी उत्पादनात कृषीचे नगण्य आहे. कारण शेतीसाठी मोठया प्रमाणावर लागणारे मनुष्यबळ आणि त्या प्रमाणात मिळणार

मध्यप्रदेशात भाजपचे ओबीसी कार्ड
सीमाप्रश्‍नाचा लढा !
समानतेच्या दिशेने…

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र देशाच्या जीडीपी उत्पादनात कृषीचे नगण्य आहे. कारण शेतीसाठी मोठया प्रमाणावर लागणारे मनुष्यबळ आणि त्या प्रमाणात मिळणारे नगण्य उत्पादन हा चिंतेचा विषय आहे. तसेच देशभरात अनेक वस्तूंची आयात केली जाते, मात्र निर्यात फार कमी प्रमाणात केली जाते. मात्र कृषी क्षेत्र निर्यातीमध्ये झेप घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी प्रगत होत असतांना, दुसरीकडे त्याला परकीय चलन मिळण्याच्या वाटा मोकळया होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील कृषी निर्यातीत वाढ ही कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बाब आहे. राज्यात एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पंचनामे करुन, तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. शेतकरी वर्ग कायमच नागवला जात असल्याचा अनुभव. कधी निसर्ग, कधी, व्यापारी, तर कधी बोगस बियाणं शेतकर्‍यांची थट्टा करत असल्याचा अनुभव नेहमीच शेतकर्‍यांना येतो. तरी देखील शेतकरी या संकटांसमोर न झुकता ताठ मानेने पुन्हा सावरून शेतीकडे वळतो. तो आपल्या काळया मातीशी कधीच बेईमानी करत नाही. त्यामुळे चांगल्या कष्टाला देखील काळी माती चांगला मोबदला देते. निमित्त ठरले कृषी निर्यातीत झालेली वाढ. महाराष्ट्र राज्यात कृषी निर्यातीत झालेली वाढ कौतुकास्पद असून, शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी आहे. फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत देखील आपण घेतलेली झेप मोठी आहे. 2020-21 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातून होणारी शेतीमालाची निर्यात 22 टक्क्यांनी वाढली आहे, त्यात द्राक्षे आणि केळीचा वाटा सर्वाधिक आहे. आनंदाची बाब म्हणजे चंद्रपूर, भंडारासारख्या मागास जिल्ह्यांतूनही भेंडीची निर्यात होऊ लागली आहे. कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातून 2285 कोटी रुपये किमतीच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 98 टक्के असून, नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून द्राक्ष निर्यात झाली आहे. बेदाण्याची निर्यातही सुमारे 160 कोटींवर गेली आहे, त्यात सांगली, नाशिक आणि सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. द्राक्षापाठोपाठ केळीच्या निर्यातीत वेगाने वाढ होत आहे. जळगाव, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून 923 कोटी रुपयांच्या सुमारे 2,73,381 टन केळींची निर्यात विशेषकरून आखाती आणि युरोपीय देशांना झाली आहे.
देशात सर्वाधिक कर हा महाराष्ट्रातून जातो, त्याचप्रमाणे निर्यातीमध्ये देखील महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा निश्‍चित आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गेल्या पाच वर्षांत निर्यातीत झालेली घसरण, त्यातच आलेला कोरोना यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे कृषी क्षेत्राची निर्यात ही नगण्य झाली होती. मात्र यातून आता कृषी क्षेत्र सावरतांना दिसून येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदुरबार, पालघर, चंद्रपूर, भांडारा या जिल्ह्यांतून भाजीपाल्याची निर्यात सुरू झाल्याचे आनंददायी चित्र 2021-22 या आर्थिक वर्षांत दिसून आले आहे. नऊ कोटी रुपयांच्या भेंडीची निर्यात झाली असून, पुणे, सातारा जिल्ह्याच्या बरोबरीने भंडारा, चंद्रपूर, नागपूर, ठाणे, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यातून निर्यात सुरू झाली आहे. 274 कोटी रुपयांच्या 41022 टन हिरव्या मिरचीची निर्यात झाली आहे. मात्र निर्यात वाढली असली तरी त्यात अजून बरीच सुधारणा करता येऊ शकते. त्यासाठी पेंड, केळी, कापूस, मक्याचे पीठ अशा उत्पादनांची निर्यातकेंद्री युनिट स्थापन करता येऊ शकतात. राज्याच्या 36 पैकी भंडारा, परभणी, उस्मानाबाद, बीड आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांनी अलीकडच्या काळात निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. भंडारा जिल्ह्यातून होणार्‍या निर्यातीला तांदळामुळे चालना मिळाली आहे. या क्षेत्राला अजून चालना देऊन कृषी क्षेत्रातील निर्यात वाढवता येऊ शकते.

COMMENTS