अहमदनगर/प्रतिनिधी ः इन्कमटॅक्स (आयकर) विभागाच्या पुणे विभागातील तपास पथकाने गुरुवारी नगर शहरात चर्चेचे काहूर उठवून दिले. दोन ठिकाणी त्यांनी छापे
अहमदनगर/प्रतिनिधी ः इन्कमटॅक्स (आयकर) विभागाच्या पुणे विभागातील तपास पथकाने गुरुवारी नगर शहरात चर्चेचे काहूर उठवून दिले. दोन ठिकाणी त्यांनी छापे मारल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. मात्र, ते कोठे व का मारले, याची अधिकृत माहिती कोणालाही नाही. पण दिवसभर सोशल मिडियातून ईडी, सीबीआय, सीआयडी यांच्या छाप्यांची रंगलेली चर्चा सायंकाळी इन्कम टॅक्सच्या छाप्यांवर शिक्कामोर्तब करून गेली. पण त्यांच्याकडूनही हे छापे कोणावर टाकले व तेथे काय सापडले, याची अधिकृत माहितीच दिली गेली नसल्याने दिवसभराची चर्चा सायंकाळीही फक्त चर्चाच राहिली.
नगर शहर व जिल्ह्यातील एका तालुक्यात काही गुटखा व सुगंधी तंबाखू व्यावसायिकांवर संशयित आर्थिक व्यवहारांप्रकरणी छापेमारी केल्याचे समजते. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती इन्कमटॅक्स (आयकर) विभागाकडून देण्यात आलेली नाही. या कारवाईमुळे मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे येथील आयकर विभागाच्या तपासणी विभागाने बुधवारपासूनच नगर शहरामध्ये ठाण मांडले असल्याचे सांगितले जाते. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी माहिती संकलित करून गुरुवारी पहाटेच्या दरम्यान मुकुंदनगरमधील एका व्यावसायिकाच्या घरी तपासणीसाठी छापा टाकल्याचे सांगितले जाते. या व्यवसायिकाच्या आलमगीर येथील नव्याने सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणीही आयकर विभागाच्या अधिकार्यांनी तळ ठोकल्याचे समजते. त्यानंतर प्रोफेसर कॉलनी परिसरातील एका इमारतीमधील व्यावसायिकाच्या घरीही आयकर विभागाच्या पथकाने दिवसभर तपासणी केल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात नगर येथील आयकर विभागाशी संपर्क साधला असता, नगर कार्यालयाकडून कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले व नेमकी कोणी ही कारवाई केली, हेही माहीत नसल्याचे स्पष्ट केले गेले.
बंदूकधारी फिरल्याने चर्चाच चर्चा – गुरुवारी पहाटेपासून पोलिस बंदोबस्त आलेल्या आयकर विभागाच्या अधिकार्यांनी आलमगीर, मुकुंदनगर व सावेडी उपनगरात तपासण्या केल्याने या परिसरात मोठी चर्चा सुरू होती. बंदूकधारी पोलिसांच्या उपस्थितीत आयकर विभागाच्या अधिकार्यांच्या वाहनांचा ताफा परिसरातून फिरल्याने त्या परिसरातही विविध चर्चांना उधाण आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आयकर विभागाकडून या कारवाई संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पोलिस प्रशासनाकडेही यासंदर्भात कोणतीही अधिकृत नोंद देण्यात आलेली नाही. दरम्यान, ही कारवाई कुणाची याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नसून, संबंधित कारवाई आयकर विभागाकडून झाल्याचे नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी सांगितले.
COMMENTS