नागपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र, असो की, देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून मी तुुम्हाला सावध करू इच्छितो. शॉर्टकटच्या राजकारणाची ही व
नागपूर प्रतिनिधी – महाराष्ट्र, असो की, देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून मी तुुम्हाला सावध करू इच्छितो. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती वाढत आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणे हाच त्यांचा हेतू असतो, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरात विरोधकांवर केली. नागपुरात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचे निर्माण करु शकत नाहीत. भारत पुढील 25 वर्षांचे धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. दुसर्या आण तिसर्या वेळीही आपण मागे होतो. पण आज देशात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, तेव्हा भारत ती संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अकरा तार्यांच्या विकासाचा नक्षत्र योग जुळून आला आहे. हा अकरा तार्यांच्या विकासाचे नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती देणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपूर दौर्यादरम्यान विविध अकरा विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमानिमित्त मिहानमधील एम्स रुग्णालय परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधानांनी सांगितले की, देशात आणि राज्यात संवेदनशील सरकार असून प्रत्येक प्रकल्पात मानवी संवेदना असल्याने प्रत्येकाचा विकास सरकार साधत आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकरी उद्योग प्रवासी विविध धार्मिक क्षेत्रातील भाविक या सर्वांना सेवा मिळणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. आज होत असलेल्या सर्व प्रकल्पांच्या लोकार्पण उद्घाटन भूमिपूजनात पायाभूत सोयी संदर्भात वेगळे चित्र दिसून येत आहे. एका बाजूला एम्स सारखे रुग्णालय आहे, दुसर्या बाजूला समृद्धी सारखा महामार्ग आहे. तिसर्या बाजूला मेट्रो आणि रेल्वेचे प्रकल्प आहेत. हा विकासाचा एक पुष्पगुच्छ असून हे सर्व प्रकल्प एकत्र आल्याने राज्यात विकासाचा सुगंध दरवळत आहे. सर्वांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा शिक्षण काही लोकांपर्यंत मर्यादित होते, तेव्हा देशाची खरी प्रतिभा समोर येत नव्हती. जेव्हा बँकिंग आणि व्यापाराच्या सेवा काही लोकांपर्यंत मर्यादित होत्या, तेव्हा त्याचा लाभ मर्यादितच होता. त्यामुळे समाजाचा एक मोठा घटक विकासापासून वंचित होता. जे वंचित होते, ज्यांना छोटं समजलं जात होते. ते आज आमच्या सरकारमध्ये प्राधान्यावर आहे. छोटे शेतकरी असो किंवा रस्त्यावर व्यवसाय करणार्या सर्वांनाच सरकारमध्ये प्राधान्यावर आहेत. त्यांना लाभ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात – समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषण करण्यास सुरुवात केली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संकष्टी चतुर्थीनिमित्त टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे नमन’, मोदींनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. आजच्या आपल्या नागपूर दौर्यादरम्यान पंतप्रधानांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.
प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बैठका झाल्या – मुख्यमंत्री शिंदे
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होऊ नये, या प्रकल्पात अडथळे कसे आणता येईल, यासाठी काहीजणांनी बैठका घेतल्या असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचे लोकर्पण झाल्यानंतर दिला. आज मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचे लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतल्याचे बोलले जात आहे.
75 हजार कोटींच्या 11 विकासकामांचे लोकार्पण – नागपूर मेट्रोच्या फेज-1 चे लोकार्पण आणि दुसर्या फेजचे भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास प्रकल्प, अजनी येथे 12 हजार हॉर्सपावर क्षमतेच्या रेल्वे इंजिन मेनटेंनस डेपो निर्मिती, रेल्वेच्या कोली नरकेट प्रकल्पाचे उद्घाटन ही सुमारे 75 हजार कोटींच्या 11 विकास प्रकल्पाचे लोकार्पण केले.
COMMENTS