नगरमध्ये विठू नामाचा…रंगला गजर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये विठू नामाचा…रंगला गजर

निवृत्तीनाथांच्या पालखीचे आगमन, महापौरांनी केले स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी :विठ्ठल… विठ्ठल…नामाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकाराम माऊलीच्या जयघोषात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील श्रीसंत शिरोमणी निवृत्

दलित पँथरने दिला डॉ. सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा
अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…

अहमदनगर/प्रतिनिधी :विठ्ठल… विठ्ठल…नामाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकाराम माऊलीच्या जयघोषात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील श्रीसंत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज पालखीचे शुक्रवारी सायंकाळी नगरमध्ये आगमन झाले. औरंगाबाद महामार्गावर आलेल्या या पालखीचे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी स्वागत केले. यावेळी पांडुरंगाचा जयघोष करण्यात आला. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे व या पार्श्‍वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील दिंड्या व पालख्या नगर शहरातून पंढरपूरकडे जात आहेत. यामुळे नगर-औरंगाबाद महामार्ग वारकर्‍यांनी फुलून गेला आहे. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. या वारकर्‍यांना चहापाणी, फराळ केला जात आहे. त्यांच्यासमवेत काही अंतर पायी वारीही नगरमधील भाविक मंडळी करीत आहेत.

निवृत्तीनाथ पालखी स्वागत
नगर शहरात यंदा सर्वप्रथम आगमन झालेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. महापालिकेद्वारे महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी पालखीतील निवृत्तीनाथांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे दर्शन घेतले. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे तसेच नेत्रदूत जालिंदर बोरुडे, मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, मनपाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. स्वागतानंतर महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेतले. तर त्यांचे पती व मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे यांनी गळ्यात टाळ घालून भजन म्हणण्याचा आनंद लुटला. वारकर्‍यांसमवेत काही अंतर त्यांनी पार केले. यावेळी मनपाद्वारे या पालखीसमवेत असलेल्या संतवृंदांचेही पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.

आज पालखीचा मुक्काम
त्र्यंबकेश्‍वरहून निघाल्यानंतर संगमनेर, श्रीरामपूर व राहुरी मार्गे वांबोरी घाटातून नगरला आलेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम आज शनिवारी (25 जून) मार्केट यार्डमधील हमाल पंचायत भवन परिसरात आहे. येथे आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हमाल पंचायतीचे अध्यक्ष व नगरसेवक अविनाश घुले यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी या पालखीच्या वास्तव्यासाठी आवश्यक सुविधांचे नियोजन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले व हमाल पंचायतचे पदाधिकारी, हमाल, मापाडी, महिला कामगार उपस्थित होते. यावेळी वारकर्‍यांची फुगडी रंगली.

COMMENTS