Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम

शेवटचे महत्वाचे दोन दिवस ठरवणार महापौर कोणाचा ?नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून शहरातील र

भाजपला 20 जानेवारीला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष
महाविकास आघाडी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू !
राज्यात भाजपच ठरला पुन्हा ’धुरंधर’ !

शेवटचे महत्वाचे दोन दिवस ठरवणार महापौर कोणाचा ?
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष आणि नेते आपापल्या पद्धतीने सत्तेचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक केवळ पक्षांची नव्हे, तर कार्यकर्त्यांचे भवितव्य आणि शहराच्या दिशेचा कौल ठरवणारी ठरणार आहे. चौरंगी लढती, बंडखोरी, आघाड्या-युतीतील अंतर्गत संघर्ष आणि परस्परांवर होणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे नांदेडची राजकीय लढाई अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.
भारतीय जनता पार्टीकडून नांदेडचा विकास आम्हीच करून दाखवणार असा ठाम दावा केला जात आहे. भाजपाचे निवडणूक प्रमुख तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रचारादरम्यान शहरातील वाढती गुंडगिरी, कोचिंग क्लासेस परिसरातील टारगट मुलांचा त्रास आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. शहर सुरक्षित व्हावे, विद्यार्थी व पालक भयमुक्त वातावरणात राहावेत यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप हा निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष असल्याचे सांगत, या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. विकसित नांदेड घडविण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. परंतु या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गट काँग्रेस युक्त भाजपाच्या बरोबर नसल्यामुळे अशोकरावांना गल्लीबोळात पक्षाच्या सभा घ्याव्या लागल्या. यापूर्वी काँग्रेसच्या काळात अशोकराव क्वचितच गल्लीबोळात सभा घ्यायची असे काँग्रेसचे कार्यकर्ते आज सांगतात.  दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक भूमिकेत दिसत आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी थेट महापौर पदावर दावा ठोकत महापौर शिवसेनेचाच होणार आणि तोही तरोडा भागातूनच असे ठाम विधान केले आहे. तरोडा येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या विरोधात राजकीय चक्रव्यूह रचण्यात आला असून सर्वच पक्षांचे तसेच स्वपक्षातील काही नेतेही अडथळे निर्माण करत आहेत. मात्र या सर्वांवर आपण भारी पडू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही आक्रमक भाषा वापरत नांदेड महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. महापालिकेत साचलेली भ्रष्टाचाराची दुर्गंधी साफ करायची असेल, तर शिवसेनेला विजयी करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले. करपलेली भाकरी परतवण्याची आता वेळ आली आहे, या त्यांच्या विधानाने सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांनीही शिवसेनेच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन करत महानगरपालिकेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शिवसेनेला सत्तेत आणण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, सध्याची व्यवस्था बदलल्याशिवाय पारदर्शक कारभार शक्य नाही. दरम्यान, काँग्रेसही या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे खा. रवींद्र चव्हाण यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका करत सत्तेची स्वप्ने पाहणार्‍यांना मतदार चांगलाच हिसका दाखवतील असा टोला लगावला आहे. राज्यातील महायुतीमधील तीनही घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असून, त्यांच्या हातात नांदेडसाठी कोणतेही ठोस विकासाचे व्हिजन नाही, असा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक म्हणजे सत्ताधार्‍यांच्या अपयशावर जनतेचा कौल ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. या सर्व राजकीय दाव्यांमधून एक बाब मात्र स्पष्ट होत आहे-नांदेडची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आहे. अनेक प्रभागांमध्ये चौरंगी लढती होत असल्याने कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा खात्रीने करता येत नाही. सत्ता स्थापनेचे गणित प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत मतदारांच्या मनात होणार्‍या बदलांवरच अवलंबून आहे. शहरातील विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार, कायदा-सुव्यवस्था आणि कार्यकर्त्यांचे भवितव्य-या सगळ्या मुद्द्यांभोवती फिरणारी ही लढाई अखेर 16 जानेवारीला निकालाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपली बाजू मजबूत असल्याचा दावा करत असला, तरी नांदेडकरांचा खरा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विकासाच्या प्रश्नांवर नागरिकांचा कौल महत्त्वाचा असून नांदेडकरांना खरोखरच विकास हवा आहे त्यामुळे विकास करणार्‍या पक्षाबरोबर ते राहतील असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादी युती, महायुतीत अंतर्गत विसंवाद पुन्हा चर्चेत
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय परिस्थिती गोंधळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर काही प्रभागांत स्वबळावर उमेदवार उभे करून स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी, शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे करत आहेत. या युतीला विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा दिसून आला आहे. याव्यतिरिक्त, प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण नांदेड हिरवे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपांमुळे महायुतीतील इतर घटक पक्षही अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत अविरोध, आरोप-प्रत्यारोप, युती-आघाडी आणि स्वबळाचे प्रयोग यांच्या माध्यमातून नांदेडची राजकीय लढत अधिक रंगतदार झाली आहे. मतदारांचा निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS