अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन; माजी आ.भीमराव धोंडे यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशाराकडा । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील सराटेवडग

अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन; माजी आ.भीमराव धोंडे यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा
कडा । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव, आनंदवाडी, रुई-नालकोल व नांदा परिसरातील बंधारे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित होऊन पूर्णतः जीर्ण अवस्थेत पोहोचले आहेत. या बंधार्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील शेती, पाणी साठवण व्यवस्था तसेच शेतकर्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधार्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिला आहे. त्यांनी तहसीलदार आष्टी तसेच मृदा व जलसंधारण उपविभाग आष्टी येथील उपविभागीय अधिकार्यांना याबाबत लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात माजी आमदार धोंडे यांनी नमूद केले आहे की, बंधार्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही मृदा व जलसंधारण उपविभाग आष्टी कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाकडून दाखविण्यात येणार्या उदासीनतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाल करत येत्या दोन दिवसांत, म्हणजेच दि. 5 जानेवारी 2026 पर्यंत बंधार्यांच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू करावे, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत कामास सुरुवात न झाल्यास मंगळवार, दि. 6 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे शेतकर्यांचे लक्ष
शेतकर्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नाकडे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शेतीविषयक मूलभूत विकासकामांकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने तात्काळ पावले उचलून बंधार्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS