कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…

नगरमध्ये हिंदुत्ववाद्यांमध्ये रंगली राजकीय चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी - सकल हिंदू समाज अहमदनगर जिल्ह्याच्या पुढाकाराने नगरला बुधवारी झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात मध्यप्रदेशमधील कालिपुत्र कालिचरण महा

*म्युकर मायकोसिसचे संक्रमण हवेतून होऊ शकते – डॉ.गुलेरिया | पहा सुपरफास्ट २४ | LokNews24*
मुर्शतपूर शिवारात आढळले बिबट्याचे बछडे
कोपरगाव तालुक्याला पुरेपूर इंजेक्शनचा साठा मिळावा : विवेक कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी – सकल हिंदू समाज अहमदनगर जिल्ह्याच्या पुढाकाराने नगरला बुधवारी झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात मध्यप्रदेशमधील कालिपुत्र कालिचरण महाराज यांचे जोरदार भाषण झाले. हिंदुत्वाचा हुंकार त्यांनी प्रकट केल्याने व हिंदूविरोधकांवर जोरदार टीका केल्याने या महाराजांना नगरमधून विधानसभेसाठी उभे केले तर कसे राहील, अशी अनोखी व आगळीवेगळी चर्चा हिंदुत्ववादी राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. अर्थात ही चर्चा, दिल्लीगेटजवळ जेव्हा कालिचरण महाराज यांचे भाषण जोरात सुरू होते व त्याला उपस्थित नागरिकांकडून टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद सुरू असतानाच रंगली होती. गांभीर्याने याबाबत विचार करायला हवा व वरिष्ठांशीही चर्चा करायला हवी, असे भाष्यही काहीजणांनी यावेळी केले.

देशाच्या राजकारणात धार्मिक नेतेही अनेक आहेत. योगी आदित्यनाथ तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. याशिवाय उमा भारती, सिद्धेश्‍वर महाराज, साध्वी ऋतुंबरा असेही अनेकजण राजकारणात आहेत. या पार्श्‍वभूमीवर कालिपुत्र कालिचरण महाराज यांचे राजकारणात येणे कोणालाही नवीन वाटणार नाही. पण अहमदनगरसारख्या शहरातील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी करायला लावणे व शहरातील प्रखर हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबा मिळवण्याची सुरू झालेली चर्चा नगरच्या राजकारणात गांभीर्याने घेतली जाण्याची शक्यता आहे.

कट्टर शिवसैनिक व हिंदुत्ववादी माजी आमदार अनिलभय्या राठोड यांनी सलग पाचवेळा नगरच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवले आहे. पण त्यांच्या निधनाने स्पष्टपणे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे कोणी राहिले नाही. पक्षीय भूमिका म्हणून भाजप, शिवसेना दोन्ही गट, मनसे वा अन्य पक्ष एखाद्या घटनेनुसार हिंदुत्वाची भूमिका कमी-जास्त प्रमाणात घेतात, मतेही व्यक्त करतात. पण त्यांना मर्यादा पडत असल्याने तसेच शहरात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे राजकारण जोरात असल्याने व त्यांच्यात हिंदुत्ववादी मतांची खेचाखेची सुरू असल्याने अशा स्थितीत कट्टर हिंदुत्ववादी कालिचरण महाराजांनाच नगरमधून उभे केले तर काय होईल, असा सवाल एका राजकीय नेत्याने केला आणि उपस्थित अन्य राजकीय नेत्यांचे डोळे विस्फारले गेले. विषय विचार करण्यासारखा आहे, असे सावध मतही काहींनी व्यक्त केले.

नगरमधील सर्वपक्षीय राजकारण्यांचे हिंदुत्व बेगडी आहे व त्यांना सर्वांनाच बरोबर घ्यायचे आहे. अशा स्थितीत फक्त हिंदुत्वासाठी कोणीही समोर येत नसल्याने कालिचरण महाराजांसारखा कट्टर हिंदुत्ववादीच नगरच्या उमेदवारीसाठी योग्य राहील, असे मत काही राजकीय पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. याबाबत आपल्या पक्षाच्या वरिष्ठांशीही चर्चा करू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र, यामुळे एकीकडे कालिचरण महाराजांचे भाषण जोरात सुरू असताना नगरच्या राजकीय अवकाशात नवीनच राजकीय ध्रुवीकरण दिसू लागले आहे. विधानसभा निवडणुकीला अजून किमान दोन वर्षे बाकी आहेत. मात्र, आतापासूनच त्याची चर्चा सुरू झाली आहे. कालिचरण महाराजांची संभाव्य उमेदवारी याच चर्चेचा भाग आहे. पण तिने शहराच्या राजकारणात खळबळ मात्र उडवून दिली आहे. दरम्यान, अस्खलीत मराठीत बोलणारे कालिचरण महाराज मूळचे अकोला जिल्ह्याचे रहिवासी असून, मध्यप्रदेशात इंदोरमध्ये त्यांचे वास्तव्य असते. भय्युजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक उपदेशक म्हणून ते परिचित आहेत व वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. बुधवारी नगरला त्यांनी जनआक्रोश मोर्चात जोरदार केलेले भाषणही चर्चेत आहे.

शिवसेना पदाधिकार्‍यावर गुन्हा – हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमजा शाहिद शेख (रा. हातमपुरा, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍याला गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करण्यात आली होती. उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनीही या तक्रारीची दखल घेत कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनआक्रोश मोर्चा स्टेटसमुळे मारहाण – भिंगार परिसरामधील भिंगार हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षीय तरुणाला दहा ते पंधरा तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेला तरुण गुरुवारी सकाळी भिंगार हायस्कुल येथे गॅदरिंग बक्षीस समारंभाला गेला होता. त्यावेळी मागे बसलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्याला खडे मारले. याबाबत मागील मुलांना जाब विचारला असता त्यांनी त्या तरुणास, तू बाहेर ये, तुला दाखवतो असे म्हटले. तो तरुण शाळेच्या बाहेर आल्यानंतर त्याला, तुझ्या मित्राने बुधवारी झालेल्या जनआक्रोश मोर्चातील फोटो स्टेटसला का ठेवला म्हणून दहा ते पंधरा जणांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भिंगार कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS