Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

12 वी परीक्षेच्या कॉपीमुक्त अभियानाला धक्का

काकांडी केंद्रावरील गैरप्रकारानंतर शिक्षण विभागाची कठोर कारवाई नांदेड ः राज्य मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभा

धावत्या ट्रॅव्हल्समध्ये लेडीज स्पेशल ऑपरेशन ; सोन्याची बॅग उडाली, प्रवासी हादरले
नांदेड मनपा निवडणुकीत काँग्रेसचा जनाधार एमआयएमकडे
नांदेड जिल्हा बँकेच्या भरतीला पुन्हा ‘ब्रेक’

काकांडी केंद्रावरील गैरप्रकारानंतर शिक्षण विभागाची कठोर कारवाई
नांदेड ः राज्य मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या स्पष्ट सूचनांना नांदेड जिल्ह्यातील काकांडी येथील शिवशक्ती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गंभीरपणे धाब्यावर बसवल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपशिक्षणाधिकार्‍यांच्या अचानक भेटीदरम्यान परीक्षेतील पर्यवेक्षण व्यवस्थेत मोठी हयगय आणि अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने केंद्र संचालकांसह संपूर्ण पर्यवेक्षकीय यंत्रणेला कारणे दाखवा नोटीस बजावत कठोर भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाच्या पेपरदरम्यान उपशिक्षणाधिकार्‍यांनी या केंद्राला भेट दिली असता, परीक्षा प्रक्रियेत नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. एका परीक्षार्थ्याकडे कॉपीचे साहित्य आढळून आले, ही बाब विशेषतः गंभीर मानली जात आहे. नियमानुसार परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून तपासणी करणे बंधनकारक असताना असे साहित्य वर्गापर्यंत पोहोचल्याने पर्यवेक्षकांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. प्राथमिक चौकशीत पर्यवेक्षकांनी कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखविल्याचे तसेच विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास मूकसंमती दिल्याचे संकेत मिळाल्याचे समजते. केंद्र स्तरावर अपेक्षित शिस्त राखण्यात त्रुटी राहिल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. याशिवाय, केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांना आवश्यक लेखी सूचना न देणे, भरारी पथकास योग्य सहकार्य न करणे आणि परीक्षेतील पारदर्शकतेसाठी बंधनकारक असलेल्या झूम वेबकास्ट ऑनलाईन प्रणालीकडे दुर्लक्ष करणे या बाबींची नोंद चौकशीत करण्यात आली आहे. सहा आणि नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन केंद्रावर झाले नसल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
या सर्व पार्श्‍वभूमीवर केंद्र संचालक पी. जी. पवार यांच्यासह पर्यवेक्षक, तपासणी पथक आणि बैठे पथकातील सर्व सदस्यांना तीन दिवसांच्या आत समक्ष हजर राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास किंवा वेळेत प्रतिसाद न दिल्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नियमावलीनुसार कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हा परीक्षा समितीने वारंवार सूचना देऊनही नियमावलीची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट होत असल्याने कॉपीमुक्त अभियानाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांची तपासणी न करणे, डिजिटल देखरेखीपासून दूर राहणे आणि परीक्षा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा या मुळे संपूर्ण जिल्ह्याच्या परीक्षा प्रक्रियेलाच डाग लागल्याची भावना शिक्षण वर्तुळात व्यक्त होत आहे. या गंभीर पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाने तातडीचे पाऊल उचलत केंद्र संचालक पी. जी. पवार यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी तुप्पा येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. जी. माने यांची नवीन केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या ऐन काळात केंद्र संचालक बदलण्याचा हा निर्णय प्रशासनाची शून्य सहनशीलता दर्शवणारा मानला जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर परीक्षा केंद्रांमध्येही सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून कॉपीमुक्त अभियान अधिक काटेकोरपणे राबविले जावे, अशी अपेक्षा पालक व शिक्षणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाकडून पुढील तपास सुरू असून दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS