खून्याला व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती कशी?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

खून्याला व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती कशी?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना चुकीच्या पध्दतीने सांगणे हे अलिकडच्या काळात सर्रासपणे होताना दिसते. वास्तविक, अभिव्यक्ती या संकल्पनेत व्यक्तिच्या

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी
आरक्षणाच्या न्यायासाठी ओबीसींचे विभाजन आवश्यक !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना चुकीच्या पध्दतीने सांगणे हे अलिकडच्या काळात सर्रासपणे होताना दिसते. वास्तविक, अभिव्यक्ती या संकल्पनेत व्यक्तिच्या भावना, विचार, कल्पना, लेखन, कला यातून व्यक्त होण्याची प्रक्रिया म्हणजे अभिव्यक्ती. विचार हा मूर्त-अमूर्त अशा कोणत्याही घटकात मोडत नसला तरी तो व्यक्त करण्याने अनेक घटनांना जन्म मिळतो. जसं आज कधी शिवसेनेच्या मंचावरून नाटकीय भाषण करणारे आणि हळूच राजकारणात शरद पवारांच्या पक्षात आल्यावर थेट संसदेत निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांच्या महात्मा गांधी यांचा खूनी नथ्थूराम गोडसे याची भूमिका चित्रपटात साकारण्याचा विषय चर्चेत आला. या देशात गांधी आणि नथ्थूराम यांचा संदर्भ देत-घेत अनेक वाद चर्चेला येत असतात. महात्मा गांधी यांचा खून करणारा नथ्थूराम या देशातलाच नव्हे जगातला पहिला दहशतवादी आहे. अर्थात, त्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भात चर्चा करण्याचा आजचा हेतू आणि विषय नाही; तर अभिनेते आणि आता खासदार या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदावर निवडून आलेल्या अमोल कोल्हे यांचे सार्वजनिक जीवन लोकांचे प्रतिनिधित्व म्हणून आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले ते लोक महात्मा गांधी यांच्या खूनाचे समर्थन करतात का, हे आधी त्यांनी लोकांकडून जाणून घ्यायला हवे. जर ते भाजपाचे खासदार असते तर कदाचित, हा प्रश्न आम्ही विचारला नसता. अभिनय करणे हा त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय असला तरी काही वैचारिक अधिष्ठान मान्य करावे लागते. राजकीय भूमिका घेऊन खून करण्याची परंपरा जगात कुठेतरी अधिकृतपणे स्विकारली गेली आहे काय? जर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर अमोल कोल्हे गांधींच्या खून्याचे व्यक्तिमत्त्व कोणत्या आधारावर साकार करित आहेत. ज्या व्यक्तीला देशाच्या जनतेने, न्याय पालिकेने, कायद्याने संविधानाच्या आधारे गुन्हेगार ठरवला आहे, त्या व्यक्तिची भूमिका ज्यांना त्यांच्या जीवनात मानायची असेल ती त्यांनी खुशाल मानावी. परंतु, संवैधानिक भारतात खूनी नत्थूराम चे उदात्तीकरण खपवून घेणे हे एक प्रकारे देशात अराजकतेचे निमंत्रण ठरेल! खूनी नथ्थूराम याने त्याचे दहशतवादी रूप गांधीजींच्या खूनाने जगाच्या समोर आणल्यानंतर त्याची अभिव्यक्ती राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या अभिव्यक्ती च्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जे काही मांडू पाहतात ते त्यांनी त्यांच्या टोळक्यात खुशाल मांडावे. परंतु, अभिव्यक्ती च्या नावाखाली नत्थूराम चे खूनी विचार सार्वजनिक मंचावर आणून त्यांनी ब्राह्मणेतर समाजाच्या तरूणांना चुकीचा इतिहास सांगू नये. अमोल कोल्हे हे राजकारणातून अभिनयाकडे आणि अभिनयातून राजकारणाकडे जे जात येत आहेत, त्यातून ते त्यांच्या फाॅलोअर्स असणाऱ्या प्रेक्षकांचा अपमान तरी करित आहेत किंवा त्यांना फसवत तरी आहेत. अमोल कोल्हे यांचा अभिनय डोक्यावर घेणारे ब्राह्मणेतर प्रेक्षक आहेत. त्यांच्या फॅन फाॅलोअर्समध्ये संघ शाखेतील किती प्रेक्षक आहेत, हे एकदा त्यांनी पडताळून पहावं. त्यांना मिळालेले राजकीय यश हे त्यांच्यातील लोकप्रिय अभिनेत्याला मिळालेले आहे. त्यांची लोकप्रियता वाढवणारे प्रेक्षक हे ब्राह्मणेतर आहेत. आणि ब्राह्मणेतर प्रेक्षक हे महात्मा गांधी यांच्या खूनाचे उदात्तीकरण सहन करू शकत नाही. लोकप्रियता बहुजनांतून मिळवून त्यांच्या डोक्यात खूनी नथ्थूराम विषयी आपल्या अभिनयाने सहानुभूती पेरण्याचा विचार कदाचित, अमोल कोल्हे यांच्या डोक्यात आला नसेल परंतु, ते संघाच्या डोक्यात फिट्ट आहे! त्यामुळे, अमोल कोल्हे यांच्या अभिव्यक्ती च्या नावाखाली खूनी नथ्थूराम लोकांच्या गळी उतरविण्याचा हा प्रयत्न लोकशाही विरोधी आणि संघविचारांची पाळेमुळे खोलवर रूजविण्याचे एक षडयंत्र आहे! तरीही, अमोल कोल्हे यांना ती भूमिका साकारायची असेल तर त्यांनी आधी भारतीय संसदेतील प्रतिनिधित्वाचा राजीनामा द्यायला हवा. कारण ते खासदार बहुजन प्रेक्षकांच्या मतांवर झाले आहेत. जाता जाता, एक बाब याठिकाणी उद्धृत करणे आवश्यक वाटते की, सध्याच्या राजकारणात संघ आपली माणसे सर्वत्र पेरतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असणारे कोल्हे यांची संघाशी नेमकी जवळीक आहे की, त्यांचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादीचीच संघाशी जवळीक आहे, हे एकदा महाराष्ट्र च्या जनतेसमोर स्पष्ट व्हायला हवे.

COMMENTS