काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजस्थानमध्ये महागाईविरोधी आंदोलनात केलेले मार्गदर्शक भाषणाने केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि संघावर वैचारिक प्रहार
काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजस्थानमध्ये महागाईविरोधी आंदोलनात केलेले मार्गदर्शक भाषणाने केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि संघावर वैचारिक प्रहार केला. भारतीय समाज हिंदूंचा आहे, हिंदू हे व्यापक समाजव्यवस्थेचे समर्थक आहेत, तर हिंदूत्व हे या देशातील सत्तापिपासूं चे नांव आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप-संघाला घेरले. महात्मा गांधी हिंदू होते तर गोडसे हा हिंदूत्ववादी होता. गोडसेचे हिंदूत्व हे भारतातील प्रगल्भ विचार असणाऱ्या हिंदूंना बदनाम करणारे आहे. समाजात हिंसाचार निर्माण करणारे हिंदूत्व आता सत्तेत कायम राहण्यासाठी वापरले जात आहे, ज्यातून भारतीय हिंदू समाजाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम देखील केले जात आहे, असा याचा सरळ अर्थ आहे! हिंदूत्वाच्या नावे मिळवलेली सत्ता हिंदूंच्याच विरोधात वापरली जात आहे. सामान्य आर्थिक स्तर असणारा हिंदू समाज महागाईत होरपळत आहे. हिंदू समाजाला हिंदूत्वाच्या नावावरच रोजगार नष्ट करून बेरोजगार केले जात आहे. स्वयंपाक गॅस पासून, किराणासह सर्व जीवनावश्यक वस्तू सामान्य हिंदूंच्या आवाक्याबाहेर हिंदूत्ववाद्यांनी नेल्या आहेत. बेरोजगारी, दारिद्रय, साथीच्या आजारात लुटारू बनलेली वैद्यकीय व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे झपाट्याने केले जाणारे खाजगीकरण यात सामान्य हिंदूच भरडला जात आहे. तरीही, हिंदूत्वाचा जो पुकारा केला जात आहे. त्याला नेमके काय म्हणायचे, हा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंना पडला होता. ही कोंडीच राहुल गांधी यांनी फोडली आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही देखील हिंदू म्हणून स्वाभिमानाने मिरवतो परंतु, आम्ही हिंदूत्व कधीच स्विकारले नाही. आमचे हिंदू असणे हे हिंदूत्वाचे आहे, असा गैरसमज बऱ्याच लोकांचा झाला आणि होतो. परंतु, आम्ही हिंदूत्व हे आमच्यापासून लांब ठेवले. हिंदू असणे म्हणजे वैचारिक व्यापकता असणे. हिंदूत्वाचा जप करणे म्हणजे आपल्या सामान्य हिंदू बंधूना लुटणे असा हा सोपा-सरळ अर्थ आहे, आमच्या दृष्टीने. आज राहुल गांधी यांनी आम्हाला देखील उलगडा केल्याने त्यांचे वैचारिक पातळीवर आभार मानले पाहिजे. राजकारण आणि धर्मकारण हे विकसित देशांत विभक्त झाले आहे. आमच्या देशात राजकारण आणि धर्मकारण नव्हे तर राजकारणात धर्मांधकारण आणले जात आहे.यातून सत्तर वर्षात जो काही देश उभा राहिला त्यालाच उध्वस्त करण्याचे कारस्थान हिंदूत्वाच्या नावावर केले जात आहे. हिंदूंना हिंदूत्वाचे डोस पाजून दोनचार बनिया भांडवलदारांना जागतिक श्रीमंत करणारे हिंदूत्व हे आमचे नाहीच मुळी! देशात असणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना उध्वस्त करू पाहणारे तीन काळे कायदे , हिंदूत्व सांगणाऱ्या सत्तेने सातशे शेतकऱ्यांची आहुती गेल्यावर मागे घेतले. बनिया भांडवलदारांच्या हितासाठी हिंदू शेतकऱ्यांचा घेतलेला बळी कोणते हिंदूत्व सांगतो? याचाही उलगडा आज राहुल गांधी यांच्या भाषणात झालेला दिसतो. काॅंग्रेसच्या विचारसरणीशी आम्ही जुळलो नाही. भविष्यात तसे घडणारही नाही. परंतु, हिंदूत्वाच्या नावावर नावावर हिंदूंचाच जो छळ मांडला जात आहे, त्याला कोणीतरी वाचा फोडावी, असे आम्हाला वाटत होते. ती बाब राहुल गांधी यांच्या वैचारिक भाषणाने स्पष्ट झाली, असे आम्हाला वाटते आहे. या कार्यक्रमात प्रियांका गांधी यांनी देखील बोटावर मोजता येणाऱ्या भांडवलदारांसाठी केंद्र सरकारने टाकलेल्या पायघड्या या सर्वसामान्य हिंदूंची लुट करूनच होत असल्याचा आरोप केला. संबंध भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला हिंदूत्वाची नशा देणारे हे या देशाची लुट करत असून भांडवलदारांशी हातमिळवणी करून ही लूट केली जात असल्याने हिंदूंनी हिंदूत्वापासून सावध राहण्याची वेळ आली आहे!
COMMENTS