आमदार रोहित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत मागणीमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकर

आमदार रोहित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत मागणी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुर्घटनेतील सर्व बाबी पारदर्शकपणे समोर याव्यात आणि संबंधित कंपनीवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असली, तरी ज्या कंपनीच्या विमानात ही दुर्घटना घडली त्या कंपनीची जबाबदारी निश्चित करावी, असा रोहित पवार यांचा आग्रह आहे. त्यांनी युगेंद्र पवार व कार्यकर्त्यांसह बारामती पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र गुन्हा दाखल करण्यास नकार मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन घडामोडींवर चर्चा केली. पुढे विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर संवाद साधत विविध कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन केली. जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर व्हाव्यात आणि चौकशीमध्ये कोणतीही बाब दडपली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवावा, अशी विनंतीही त्यांनी केली. केंद्राकडून सविस्तर अहवाल अपेक्षित असून तो लवकरच प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपूर्ण किंवा उडताउडती माहिती स्वीकारली जाणार नाही; सर्व तपशीलांसह अहवाल हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आणखी माहिती जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बारामती येथे गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने त्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरातही तक्रार करण्याचा प्रयत्न केला. नवीन कायद्यानुसार प्रथम माहिती अहवाल नोंदवला जावा, अशी अपेक्षा होती; मात्र तेथेही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणीच गुन्हा दाखल व्हावा आणि पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा, अशी त्यांची मागणी आहे. तांत्रिक अडचणींबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती स्पष्ट करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
अजिदादांचे विधानभवन परिसरात स्मारक व्हावे
अजित पवार यांच्या स्मरणार्थ विविध मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी स्मारक उभारावे, विधानभवन परिसरात त्यांचे स्मारक व्हावे, बारामती विमानतळ अत्याधुनिक करून त्याला अजित पवार यांचे नाव द्यावे तसेच पुणे रिंग मार्गालाही त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केली आहे. तसेच या दुर्घटनेत सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत करार पद्धतीवर कार्यरत असून त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

COMMENTS