ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी दिली. पाऊस इतका मुसळधार होता की, कल्याण आणि डोंबिवलीतील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. या प

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी दिली. पाऊस इतका मुसळधार होता की, कल्याण आणि डोंबिवलीतील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली होती. तब्बल दोन तासांकडून सुरू असलेल्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते.
पालघरमधील सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे मनोर येथील पूल पाण्याखाली गेला असून वाडा ते मनोर दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली. मुसळधार पावसामुळे पालघरमधील ससून नवघर येथे विविध यंत्रणांनी हाती घेतलेली खोदाई यंत्र आणि त्याच्या ऑपरेटरची शोधमोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे. 29 मे रोजी एका आगामी पाणी प्रकल्पाच्या बोगद्यातील माती खचल्याने खोदाई यंत्र आणि त्याचा ऑपरेटर गाडला गेला होता. ठाणे शहर आणि जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत शहरात 35.51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या तुरळक घटना घडल्या. गुरुवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत शहरात 26.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे शहरात आतापर्यंत 228.93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत 50.70 मिलिमीटर पाऊस झाला होता.
COMMENTS