काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारीपुणे ः राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. अवक

काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
पुणे ः राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. अवकाळी पावसानंतर थंडीचा प्रभाव कमी होताच तापमानाने झपाट्याने वाढ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग यांनी राज्यातील काही भागांसाठी उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दुपारच्या वेळेत नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी बाहेर पडावे आणि उष्णतेपासून संरक्षणाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र दिसून येत आहे. अकोला येथे 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते सध्या देशातील उच्चांक ठरले आहे. सोलापूरमध्येही तापमान 38 अंशांवर पोहोचले आहे. पुण्यात सलग दोन दिवस कमाल तापमान 35 अंशांच्या पुढे गेले असून पारा 36 अंशांपर्यंत चढला आहे. पुढील काही दिवसांत काही भागांत तापमान 40 अंशांच्या उंबरठ्याजवळ जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पाणी व द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे, असा सल्ला देण्यात येत आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णतेबरोबरच आर्द्रतेचीही तीव्रता वाढत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दमट हवामानामुळे अस्वस्थता अधिक जाणवू शकते. मुंबईत कमाल तापमान 29 ते 32 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिल्यास उकाड्यात भर पडू शकते. देशातील काही भागांत अजूनही थंडीचा अंश कायम आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे 10 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले, तर महाराष्ट्रात धुळे येथे 12.8 अंशांची नोंद झाली. एकीकडे काही राज्यांत पावसाचा प्रभाव दिसत असताना महाराष्ट्रात मात्र उन्हाळ्याची सुरुवात लवकर होत असल्याचे चित्र आहे. हवामानातील या बदलत्या स्थितीमुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS