नाशिक प्रतिनिधी - मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या नाशिककरांना आता उकाड्याला स
नाशिक प्रतिनिधी – मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या नाशिककरांना आता उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, उष्ण वारे जाणवू लागले आहेत.
शहरातील किमान तापमानाने १८.४ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. आगामी काही दिवसांत तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तरेकडील गार वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग आठ दिवसांपासून नाशिक शहरासह राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत आहे. यासह किमान तापमानात चढ-उतार कायम असले, तरी कमाल तापमानाच्या वाढीमुळे उकाडा जाणवत आहे. नाशिकमध्ये सलग तीन दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले. सकाळी दहा वाजेपासूनच नाशिककरांना उष्णतेच्या झळा बसत आहेत.
दुपारी उष्ण वाऱ्यांचा प्रवाह अधिक असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे दीड ते साडेचार या वेळेत रस्त्यांवरील वर्दळदेखील घटल्याचे दिसते. दरम्यान, मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कडाका वाढल्याने पुढील टप्प्यात नाशिककरांना तापमानवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. गतवर्षी पाऊसदेखील अल्प प्रमाणात झाल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात बसणार आहे. मार्चअखेरीस व एप्रिल महिन्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी, आरोग्याच्या व्याधी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, तसेच शक्यतो उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
COMMENTS