केज । प्रतिनिधीबीड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून अंबाजोगाई येथे तब्बल 1100 खाटांचे
केज । प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून अंबाजोगाई येथे तब्बल 1100 खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 102 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केज मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक आरोग्य प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे.
अंबाजोगाई येथे उभारण्यात येणारे हे रुग्णालय केवळ शहरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाडा विभागासाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा: आधुनिक वैद्यकीय उपकरणे व प्रगत उपचार प्रणाली उपलब्ध मोठी रुग्ण क्षमता: 1100 खाटांमुळे गरीब व गरजू रुग्णांना जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज कमी आरोग्य सेवेचा दिलासा: स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वाढता ताण कमी होण्यास मदत याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, अंबाजोगाई व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळावी, हे आमचे स्वप्न होते. महायुती सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती देताना सांगितले की, या रुग्णालयाच्या उभारणीचे काम लवकरच युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळाल्याबद्दल आमदार मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे विशेष आभार मानले. या महाकाय रुग्णालयामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS