श्रीगोंदा ः अनैतिक संबंधाचा संशय घेऊन जाब विचारल्याने पत्नीचा खून करून, मृतदेह पुुरून विल्हेवाट लावल्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला स्थानिक गुन
श्रीगोंदा ः अनैतिक संबंधाचा संशय घेऊन जाब विचारल्याने पत्नीचा खून करून, मृतदेह पुुरून विल्हेवाट लावल्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अहमदाबाद येथून जेरबंद केले. पत्नी वाद घालून नेहमी संशय घेत असल्याने गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे (वय 33, रा. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. रूपाली ज्ञानदेव आमटे (वय 24) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत रूपालीचा भाऊ रोहित संतोष मडके(रा. फक्राबाद, जामखेड) याने श्रीगोंदे पोलिसांत फिर्याद दिली होती. तिसर्या लग्नाला विरोध केल्यामुळे त्याने आपल्या पहिल्या पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्ञानदेवचे गावातील एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे रूपालीला समजले होते. ज्ञानदेवला त्या मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे रूपाली आणि ज्ञानदेव यांच्यात यावरून वाद होत होता. या वादातून ज्ञानदेव याने रूपालीचा गळा आवळून खून करून कापडात गुंडाळून घरामागे खड्ड्यात पुरले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. नगर ’एलसीबी’चे पथक ज्ञानदेवचा शोध घेत असतांना, आरोपी ज्ञानदेव आमटे गुजरातला पळून गेल्याची माहिती तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने गुजरातच्या दिशेने रवाना झाले. शनिवारी पोलिस पथक गुजरातमध्ये पोचले. आरोपी अमदाबाद येथून असून वेळोवेळी वास्तव्य बदलत असल्याचे समोर आले. अहमदाबादमधील हॉटेल, लॉजेस व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले आणि गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, बबन मखरे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.
COMMENTS