महा कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी नंतर अवघ्या काही दिवसातच, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरी ही देशाच्या दृष्टीने अतिशय

महा कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी नंतर अवघ्या काही दिवसातच, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरी ही देशाच्या दृष्टीने अतिशय दुःखद आणि तितकी संताप जनक आणि चिंताजनक ही घटना म्हणावी लागेल. प्रशासनाने या संदर्भात नेहमीच आकडे लपवण्याची जी प्रक्रिया केलेली आहे; किंवा जो प्रयत्न केला आहे, तो लोकशाहीतील जनतेच्या दृष्टीने अतिशय निंदनीय आहे. सर्वसामान्य जनता आपल्या श्रद्धास्थानावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उस्फुर्तपणे जाते. सामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन नेमकं काय करतात, या संदर्भात आता सगळ्याच व्यवस्थेने जबाब देण्याची गरज निर्माण झालेली आहे; कारण, देश म्हणजे देशातील माणसे असतात; देशातील किटक, मुंगे किंवा झाडे-झुडपे, दगड-गोटे नव्हे, हे देशातील यंत्रणांनी लक्षात घ्यायला हवे! ज्या महा कुंभमेळ्यात देशातील श्रद्धाळू जनता आपल्या धर्मआस्थेच्या ठिकाणी उस्फूर्तपणे देशाच्या चारही बाजूने त्या ठिकाणी जाते आणि त्या सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था निर्माण केली जात नाही. याचा अर्थ जनतेला किती वाऱ्यावर सोडले आहे, हे स्पष्ट होतं. नवी दिल्ली स्टेशनवर घडलेली दुर्घटना तर केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मूर्खपणाच्या परिणामातून झालेली दिसते. महा कुंभमेळा सारख्या काळामध्ये उत्तर भारतातील अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी असताना, लोकांचे व्यवस्थापन करण्याची जराशीही काळजी रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. त्यातून प्रयागराज ला जाणारी रेल्वे नियोजित प्लॅटफॉर्मच्या पासून वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लावण्याची घोषणा केली जाते आणि त्यातून एका प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जी धावपळ झाली, त्या धावपळीतूनच ही चेंगराचेंगरी झालेली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला तर सदोष मानवी हत्याकांडाच्या घटनेला जबाबदार धरणे, अत्यंत गरजेचे आहे. शिवाय, गेल्या काही वर्षापासून रेल्वे मंत्रालयाचं अस्तित्व आहे की नाही, असा प्रश्न देशासमोर पडतो आहे. अनेक रेल्वे अपघात इतक्या सहजपणे घडत आहेत की, जणू काही सर्वसामान्य माणसाच्या प्राणाचे देशाच्या यंत्रणांना मोल वाटेनासं झालेले आहे. ज्या देशाच्या सामान्य जनतेच्या करावर संपूर्ण यंत्रणा चालत आहेत; त्या देशाच्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याची प्रक्रिया जर कोणतीही यंत्रणा करत असेल तर, त्या यंत्रणेला अतिशय कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रत्येक्षदर्शिंनी या चेंगराचेंगरी चे वर्णन ज्या शब्दांमध्ये केलेले आहे, ते शब्द नुसते ऐकले तरी अंगावर शहारे येतात. हजारो किलोमीटरवर असणारी माणसे जेव्हा त्या घटना आपल्या कानाने ऐकतात, तेव्हा, त्या लोकांना अंगावर शहारे येतात. व्यवस्थेविषयी, यंत्रणांविषयी चीड येते. परंतु, ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष घडविण्यात हातभार लावला आहे, अशा शासन-प्रशासन यांना कठोर्तम शिक्षेला सामोरे जावं लागलं पाहिजे. कारण, गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या संदर्भातला जो अनागोंदी कारभार चालला आहे, त्या संदर्भात दोषी असलेल्या यंत्रणांविरोधात कारवाई करायलाच हवी. सामान्य जनतेला जे वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार यंत्रणांनी चालवला आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचे अपघात ज्या सहजतेने घडत आहेत, याला कोणालातरी जबाबदार धरायला हवं. अन्यथा, सामान्य जनतेच्या प्राणाची किंमत कवडीमोल ठरून, अशा घटना देशभर घडविल्या जाणारच नाहीत, याची कोणतीही शास्वती देता येत नाही. त्यामुळे, सामान्य जनतेने आता अशा घटनांच्या विरोधात आपला आक्रोश आणि आपला संताप निश्चितपणे नोंदवायला हवा. यंत्रणा, शासन कोणतेही असलं आणि ते सामान्य जनतेच्या जीवाविषयीच बेफिकीर असलं तर त्या शासन यंत्रणेला जबाबदार धरायला हवं.
COMMENTS