कडा । प्रतिनिधीमहाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 दरम्यान आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या य
कडा । प्रतिनिधीमहाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 दरम्यान आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी निर्यातीवर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला. कांदा, द्राक्षे व बेदाणा या प्रमुख नगदी पिकांच्या निर्यात व्यापारावर मोठा परिणाम होत असून शेतकरी व व्यापार्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आ. धस म्हणाले की, आखाती देश हे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांचे प्रमुख निर्यात बाजारपेठ असून सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रखडली आहे. परिणामी बाजारभावात घसरण होत असून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने तत्काळ बैठक घेणे शक्य नसले तरी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून ठोस निर्णय घ्यावेत, अशी विनंतीही आ. धस यांनी केली. यावर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, चीनमार्गे अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर बोगस बेदाणा राज्यात दाखल होत असल्याचा गंभीर मुद्दाही आ. धस यांनी उपस्थित केला. पिंपळगाव बसवंत येथील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीसह तासगाव परिसरात अशा प्रकारचा माल आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या प्रश्नांमुळे राज्यातील कृषी व निर्यात व्यापार क्षेत्रात चिंता वाढली असून सरकारच्या पुढील निर्णयाकडे शेतकरी व व्यापार्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS