राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : मुश्रीफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपालांनी जनतेची माफी मागावी : मुश्रीफ

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास असल्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून, त्यांनी त

टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु
रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
बेरोजगार तरुणानं केला वडीलांचा खून; आई गंभीर जखमी l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास असल्याबाबत केलेले विधान अत्यंत चुकीचे असून, त्यांनी ते विधान तात्काळ मागे घ्यावे व जनतेची माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री व नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, राज्यामध्ये सत्तेमध्ये न आल्यामुळे भाजपद्वारे ईडीच्या कारवाया सुरू आहेत. आघाडीमध्ये अनेक नेत्यांवर कारवाई सुरू आहे, पण भाजपवाले काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
नगर येथे जिल्हा आढावा बैठक झाल्यानंतर मुश्री़फ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नामदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये याअगोदरसुद्धा अनेक वक्तव्ये वेगवेगळ्या पद्धतीतून झाली होती व त्याचा सर्वत्र निषेध झालेला होता. पण राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अवमान केलेला आहे. राज्यपाल पदासारख्या पदावर काम करणार्‍या जबाबदार व्यक्तींनी अशी वक्तव्ये करू नये, त्यामुळे त्यांनी त्यांचे वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे व जनतेची माफी मागावी, असे मुश्रीफ म्हणाले.

आम्ही फेव्हीकॉलसारखे घट्ट
राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर चालू झालेला आहे. याअगोदर सुद्धा अनेकवेळा तो सिद्ध झालेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले, त्यावेळी ईडीमार्फत अशा प्रकारच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत, हे काही नव्याने सांगायला नको, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते मग भाजपवाले काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये असा निर्णय महाविकास आघाडीच्याकडून घेण्यात आलेला आहे. ज्या वेळेला अनिल देशमुखांवर कारवाई झाली त्यावेळेला तो विषय वेगळा होता,
असेही सांगून मुश्रीफ म्हणाले, मालिकांवर आरोप होते जमिनीच्या संदर्भामध्ये, पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी जी जमीन दाऊदच्या नातेवाईकाकडून घेतली असे म्हणतात, त्यावेळेला ती जमीन ज्याच्या नावावर मुखत्यारपत्र होते, त्यांच्याकडून त्यांनी घेतलेली होती. त्याचा व्यवहार त्यांनी पूर्ण केलेला होता. मग तुम्हाला ज्या वेळेला दहा वर्ष भाजपाची केंद्रात सत्ता होती व पाच वर्ष राज्यामध्ये सत्ता होती, त्यावेळेस त्यांना हा गैरव्यवहार दिसला नाही का?, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले,फक्त महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये आले म्हणून अशा प्रकारच्या कारवायात सध्या सुरू आहेत. पण महाविकास आघाडी सरकार फेविकोल सारखे घट्ट आहे व आता अशा चौकशांच्या प्रकाराने दिवसेंदिवस फेविकोलने अधिक घट्ट होत आहे, असेही मुश्रीफ यांनी आवर्जून स्पष्ट केले.

स्थानिक पातळीवर अधिकार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये कशा पद्धतीने पुढे जायचे, यासंदर्भामध्ये स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसींच्या आरक्षणाचा विषय न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 21 मार्चनंतर राज्यातील ज्या जिल्हा परिषदांची मुदत संपलेली आहे, त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून राहतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये करोनाच्या रुग्णसंख्यामध्ये घट झालेली आहे. आज आपण रोज सहा हजार चाचण्या करीत आहोत, त्या चाचण्या आता कमी कराव्यात अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. करोना काळामध्ये जे मृत झालेले आहेत, अशांना 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत दहा हजार 401 जणांना सानुग्रह अनुदान देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नगरच्या रस्त्यांना 15 कोटी
नगर शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही महापालिकेचे आयुक्त यांना कारवाई करण्याची सूचना देऊ, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, महापालिकेला यंदा आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून 26 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यामध्ये बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या कामाचा सुद्धा समावेश आहे. या रुग्णालयाला 11 कोटी दिले असून शहरातील रस्त्यांसाठी 15 कोटी दिले असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी मुश्रीफ यांनी आयुक्त शंकर गोरे यांना नगरच्या रस्त्यांच्या दुरावस्थेचा जाब विचारल्यावर गोरे यांनी नगर शहरात मनपाने 100 रस्ते केल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी आश्‍चर्य व्यक्त केल्यावर, संबंधित रस्त्यांची यादीही देण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यावर मुश्री़फ यांनी, तातडीने ती यादी प्रसिद्धी माध्यमांना देण्याचे आदेश त्यांना दिले.

तनपुरे विषयाची माहिती घेतो
ईडीची कारवाई नगर जिल्ह्यापर्यंत आल्याची माहिती पुरेशी अजून मला नाही. पण साखर कारखाने विक्रीचा विषय असल्याचे समजते. पण अशा विक्रीची अपसेट प्राईस ठरल्यावर आलेल्या निविदेतील मोठ्या रकमेची मान्य केली जाते, असा नियम आहे. मंत्री तनपुरे कारवाईसंदर्भात नेमके काय झाले, ते माहीत नाही. त्याची माहिती घेतो, असे म्हणून मुश्रीफ यांनी यावर अधिक भाष्य टाळले.

97 गावे कोरोनामुक्त
नगर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांचे अजूनही लसीकरण झालेले नाही, अशी माहिती देऊन मुश्रीफ म्हणाले, यातील बरेचजण हे बाहेरगावी गेले आहेत तर काही ऊस तोडणी कामगार आहे. तसेच युक्रेनमध्ये 27 मुले नगर जिल्ह्यातील आहेत, त्यातील दोन मुले परत आली आहेत. चार विमाने आज गेलेली आहेत, त्यातून किती जण येतात, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. नगर जिल्ह्यामध्ये 97 गावांमध्ये एकही करोना रुग्ण आढळलेला नाही, असे सांगून ते म्हणाले, अनेक निर्बंध शिथील झालेले आहेत. मात्र, मास्कबंदी संदर्भातला विषय हा राज्य सरकारच्या अख्यत्यारित आहे, त्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

COMMENTS