खरंतर प्रशासकावर पकड असलेल्या नेत्यांना लोकनेता होता येत नाही. कारण त्यांचं बहुतांश काम हे कॅबिनमध्ये बसून प्रशासनावर पकड ठेवण्यात येते. मात्र जनत

खरंतर प्रशासकावर पकड असलेल्या नेत्यांना लोकनेता होता येत नाही. कारण त्यांचं बहुतांश काम हे कॅबिनमध्ये बसून प्रशासनावर पकड ठेवण्यात येते. मात्र जनतेशी नाळ घट्ट ठेवून, लोकांमध्ये मिसळून प्रशासनावर पकड असणारा हा लोकनेता म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतांना दिसून येतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अनुभवी प्रशासक आणि वादळी पण प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक असलेले अजित पवार (वय 66) यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी झालेल्या या अपघातात त्यांच्यासोबत असलेले वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमानातील कर्मचारी यांनाही प्राण गमवावे लागले. एका व्यक्तीच्या निधनापलीकडे जाऊन ही घटना राज्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि भावनिक पटलावर खोल परिणाम करणारी ठरली आहे.
अजित पवार म्हणजे केवळ एक पद किंवा एक नाव नव्हते. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वतंत्र पर्व होते. कठोर निर्णयक्षमता, प्रशासकीय कामकाजावरील मजबूत पकड आणि थेट, स्पष्ट बोलण्याची शैली यामुळे ते कायमच चर्चेत राहिले. त्यांच्याबद्दल समर्थन आणि विरोध असे दोन्ही सूर होते, मात्र त्यांच्या कार्यक्षमतेबाबत कुणीही दुमत व्यक्त करू शकत नाही. अशा नेत्याचे अचानक जाणे म्हणजे राज्याच्या राजकीय स्थैर्याला बसलेला मोठा धक्का आहे. या अपघाताची बातमी समजताच सर्व स्तरांतून शोकभावना व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री असोत वा विरोधी पक्षातील नेते, सत्ताधारी असोत वा कलाविश्वातील मान्यवर-सगळ्यांच्या भावना एका सूरात व्यक्त झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा भाऊ गेल्याची भावना आहे डोंगराएवढं दु:ख झालं असे शब्द वापरत जे दुःख व्यक्त केले, त्यातून या धक्क्याची तीव्रता स्पष्ट होते. राजकारणात अनेकदा कटुता, संघर्ष आणि सत्तास्पर्धा दिसतात; मात्र अशा प्रसंगी नातेसंबंधांची, मानवी भावनांची खरी खोली समोर येते. अजित पवार यांच्या जाण्याने केवळ राजकीय नेतृत्वाचीच नाही, तर अनुभवी प्रशासकाचीही पोकळी निर्माण झाली आहे. अर्थसंकल्पीय चर्चा असोत, पाणीवाटपाचे प्रश्न असोत किंवा ग्रामीण विकासाच्या योजना-त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि फाईलवर्कमधील बारकावे लक्षात ठेवण्याची सवय ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख होती. अनेक अधिकारी, कर्मचारी त्यांना कडक पण न्याय्य नेता मानत. अजित पवार पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेसाठी बारामतीला जात होते. सार्वजनिक जीवनात अखेरच्या श्वासापर्यंत सक्रिय राहण्याची त्यांची वृत्ती या प्रवासातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी जवळ येताना दृश्यमानतेची अडचण निर्माण झाली होती. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसर्या प्रयत्नात विमान धावपट्टीवरून घसरले, त्यानंतर आग लागली आणि हा अपघात घडला. विशेष म्हणजे, कोणताही आपत्कालीन ‘मेडे’ कॉल न दिला गेल्याची माहिती पुढे येत आहे. हे सारे तपशील केवळ तांत्रिक बाबी नसून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गांभीर्याने तपासण्याची गरज अधोरेखित करणारे आहेत. मात्र या अपघाताचे गांभीर्य केवळ विमान सुरक्षेपुरते मर्यादित नाही. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वतंत्र अध्याय होते. शरद पवार यांच्या राजकीय वारशातून पुढे आलेले, पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांची कारकीर्द ओळखली जाते. निर्णयक्षम, कधी कधी कठोर, तर प्रसंगी वादग्रस्त-अशा अनेक विशेषणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व वर्णन करता येईल. पण एक गोष्ट निर्विवाद होती : प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आणि कामाचा वेग. त्यांच्या राजकीय प्रवासात मतभेद, पक्षांतर्गत संघर्ष आणि सत्तेच्या गणितांमधील धक्कादायक निर्णय यांची कमतरता नव्हती. काही निर्णयांनी राजकीय समीकरणे ढवळून निघाली, तर काही निर्णयांनी त्यांच्यावर कठोर टीकेची झोड उठवली. तरीही, त्यांनी कधीही सार्वजनिक जीवनातून पाऊल मागे घेतले नाही. टीकेला सामोरे जात पुढे जाणे, हेच त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते. आज त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वावर अचानक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून ते सरकारमधील महत्त्वाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने सत्तेचे गणितच नव्हे, तर प्रशासकीय समन्वय आणि निर्णय प्रक्रियेवरही परिणाम होणार हे निश्चित आहे. विशेषतः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा धक्का अधिक तीव्र आहे. या दुःखद घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तथापि, या शोकाच्या क्षणी काही मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्हीआयपी हवाई प्रवासाची सुरक्षा, लहान विमानतळांवरील सुविधा, हवामान आणि दृश्यमानतेच्या निकषांचे काटेकोर पालन-या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. केवळ शोकसभा आणि श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता, या दुर्घटनेतून धडे घेणे हेच दिवंगत नेत्याला खरी आदरांजली ठरेल. अजित पवार यांचे निधन म्हणजे एका व्यक्तीचे जाणे नाही; तो एका राजकीय शैलीचा, एका आक्रमक कार्यपद्धतीचा आणि एका काळाचा अंत आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन इतिहास करेल, पण आजचा दिवस महाराष्ट्रासाठी शोकाचा, आत्मपरीक्षणाचा आणि जबाबदारीने पुढे जाण्याचा आहे. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत, ग्रामीण भागातील सभांपासून विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत-अजित पवार यांची उपस्थिती आता केवळ आठवणींत उरेल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, सहकार्यांप्रती आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांप्रती महाराष्ट्राने व्यक्त केलेली संवेदना ही केवळ औपचारिक नसून, अंतर्मुख करणारी आहे. राज्याने आज एक प्रभावी नेता गमावला आहे-आणि त्या रिकाम्या जागेची जाणीव येणार्या काळात अधिक तीव्रतेने होत राहील.

COMMENTS