कर्जत : शहर व परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यांची पाहणी कुंडल (जि. सांगली) येथील वन प
कर्जत : शहर व परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यांची पाहणी कुंडल (जि. सांगली) येथील वन प्रबोधिनीतील वनरक्षक प्रशिक्षणार्थींनी गुरुवारी (दि. 6) केली. या अभ्यास दौर्यामध्ये 40 महिला व पुरुष वनरक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
‘सर्व सामाजिक संघटना, कर्जत’ या समूहाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 पासून सलग 1954 दिवस (पाच वर्षांहून अधिक काळ) दररोज लोकसहभागातून श्रमदान करून राबविण्यात येणार्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांची माहिती प्रशिक्षणार्थींनी घेतली. वृक्षारोपण चळवळ, कार्यपद्धती, नियोजन व लोकसहभाग ही या उपक्रमांची वैशिष्ट्ये असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. वनरक्षक प्रशिक्षणाचा भाग म्हणून राज्यभर अभ्यास दौरे आयोजित करून विविध ठिकाणच्या वनांचे प्रकार, वृक्षप्रजाती, वनक्षेत्र, अभयारण्ये तसेच नाविन्यपूर्ण व पथदर्शक प्रकल्पांचा अभ्यास करण्यात येतो. याच अनुषंगाने प्रशिक्षणार्थींनी कर्जत येथे भेट देत भांडेवाडी येथील जैवविविधता उद्यानात 4 ऑक्टोबर 2025 रोजी एकाच वेळी लागवड केलेल्या 5555 रोपांच्या घनवन प्रकल्पाची पाहणी केली. तसेच उद्यानाच्या भोवती श्रमदानातून उभारलेल्या कुंपणासाठी लावलेल्या फुलझाडे व बांबू लागवडीचे निरीक्षण केले.
याशिवाय राशीन रोड, नगर रोड व वालवड रोड येथे रस्त्याच्या दुतर्फा लागवड केलेल्या व फुलांनी बहरलेल्या वृक्षांची पाहणी करण्यात आली. या नाविन्यपूर्ण व सातत्यपूर्ण पर्यावरण संवर्धन कार्याची प्रशिक्षणार्थींनी मुक्तकंठाने प्रशंसा करत अभ्यासपूर्ण नोंदी घेतल्या. यावेळी माहिती देण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा अभ्यास दौरा कुंडल वन प्रबोधिनीचे प्रशिक्षण निदेशक श्री. ए. एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

COMMENTS