Homeताज्या बातम्यासंपादकीय

वारी’तून सामाजिक समतेच्या दिशेने प्रवाहित !

वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी म्हणजे समतेचा विचार. वारी महाराष्ट्रात येऊन रूजण्याची कारणेही समतेच्या भूमीमुळेच महाराष्ट्राशी जुळली आ

एआयडीएमके आणि भाजप युतीला सुरूंग का?
लाडक्या बहिणीतही मातृत्व असतंच !
धोकेबाजीची उलटी गणती ! 

वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी म्हणजे समतेचा विचार. वारी महाराष्ट्रात येऊन रूजण्याची कारणेही समतेच्या भूमीमुळेच महाराष्ट्राशी जुळली आहेत. वारकरींच्या समताभूमीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या आगमनाने काही लोकांनी आगपाखड सुरू केली आहे; तर, काहींनी त्यांच्या दौऱ्याचा राजकीय फायदा अपेक्षित ठेवला आहे. परंतु, राहुल गांधी यांचा वारीत सहभागी होण्यासाठी असणारा दौरा हा समतेच्या विचारांना अनुसरून आहे, एवढे मात्र निश्चित. वारकऱ्यांच्या वारीचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत मागे जातो. समतेच्या विचारांचे अधिष्ठान आद्य शंकराचार्य यांच्या दहाव्या शतकातील उदयाने लयास नेण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न व्यवस्थेने केला; त्याची परिणती समतेचे अधिष्ठान असलेले विचार आणि तत्व अवघ्या दोनशे ते अडीचशे वर्षात लयाला गेले. या दोनशे वर्षांच्या काळात वैदिक विचार तत्वांनी समाजाच्या सर्व स्तरात आपला जम बसवला. त्यास राजकीय क्षेत्रही अपवाद नव्हते. अवैदिक व्यवस्थेच्या समता विचारांना, तत्कालीन वैदिक विचारांच्या राजसत्तेने केवळ विरोधच केला नाही; तर, हिंसक पध्दतीने अवैदिक समता व्यवस्थेला मोडून काढण्यास त्या राज्यसत्तेने प्राधान्य दिले. समता विचारांचे अवैदिक गुरूंचे खूनही त्याकाळात पाडण्यात आले. समतेच्या विचारांचा बिमोड करणाऱ्यांचा विरोध मोडून काढणे उर्वरित शिष्योत्तमांना शक्य नव्हते. परंतु, अहिंसेवर त्यांची प्रगाढ असणारी निष्ठा आणि तेच जीवन तत्व स्विकारलेल्या संतांनी अवैदिक समतेचा विचार घेऊन महाराष्ट्रात चंद्रभागेच्या काठापर्यंत मजल मारली. महाराष्ट्रात ही चळवळ रूजण्याची काही कारणे होती.

त्यात संत नामदेव हे मुळात; महाराष्ट्राचे असल्याने त्यांनी समतेची पताका चंद्रभागेचा विस्तीर्ण, सपाट भूप्रदेश हे एक कारण होते, तसे उत्तरेतील समता चळवळ आणि दक्षिणेतील संत चळवळ यांना अगदी मध्यभूमीत आणणाऱ्या या चळवळीने पांडुरंग, विठोबा यांच्या नामाचा गजर चंद्रभागेच्या तीरी करण्याची परंपरा सुरू केली. बिहारच्या निरंजना नदी आणि महाराष्ट्रातील चंद्रभागा यांच्यातील विस्तीर्ण सपाटीचे साम्य पाहिल्यावर त्यातील सांस्कृतिक इतिहासाचा एक भाग आपल्या मनात तराळून गेल्याशिवाय राहत नाही. अशा या उत्तर, दक्षिण भारताचा सांस्कृतिक सुवर्णमध्य साध्य करणाऱ्या पंढरपूरच्या वारित सहभागी होण्यासाठी येत असलेले राहुल गांधी समतेच्या परंपरेला उजाळा देतील. वारकरी हा समतेचा संप्रदाय आहे. अहिंसेचा संप्रदाय आहे. अशा या संप्रदायाला ताकद देण्यासाठी येत असणाऱ्या राहुल गांधी यांना सच्चा वारकरी विरोध कसा करू शकतो? शिवाय, या परिसरातील खासदार प्रणिती शिंदे यांनी वारिसाठी विशेष निमंत्रण शरद पवार यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांना दिले आहे. या निमंत्रणाचा स्विकार करीत राहुल गांधी दिंडीत सहभागी होणार. महाराष्ट्राच्या इतिहासात समतेच्या सांस्कृतिकतेला राजकीय शक्ती मिळते आहे, ही बाब निश्चितच एक सामान्य वारकरी म्हणून आम्हाला अभिमानास्पद वाटते. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाने समतेची पताका जीवंत ठेवली. उणापुरा आठशे वर्षांचा इतिहास असलेली वारी देशात समतेच्या चळवळीला मजबूत करित असताना राहुल गांधी नव्या सामाजिक समतेच्या दिशेने या भूमीतून प्रवाहित होतील, ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे! यात त्यांच्या राजकीय भूमिकेपेक्षा सामाजिक भूमिकेचे मूळ आहे, हे विशेष!

COMMENTS