श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असतांनाच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मि
श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असतांनाच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. त्यामुळे लडाखमध्ये एकूण सात जिल्हे होणार आहेत.
गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या एक्सवर ट्विट करत लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो. पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी देण्याबरोबरच, गृह मंत्रालयाने लडाख प्रशासनाला नवीन जिल्ह्यांशी संबंधित जसे की मुख्यालय, सीमा, रचना, पदांची निर्मिती आणि इतर कोणत्याही बाबींचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या समितीने तीन महिन्यांत अहवाल सादर करायचा आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, लडाखचा केंद्रशासित प्रदेश या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाहीसाठी गृह मंत्रालयाकडे अंतिम प्रस्ताव पाठवेल. सध्या लडाखमध्ये केवळ लडाख आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आता लडाखणधील जिल्ह्यांची संख्या वाढून 7 एवढी झाली आहे. लडाख विभागामध्ये अतिरिक्त जिल्ह्यांची मागणी बर्याच काळापासून करण्यात येत होती. लेह, लडाख आणि कारगिल विभागातील सामाजिक, राजकीय संघटना ह्या नव्या जिल्ह्यांची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखाडमधील जिल्ह्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
समृद्धीच्या दिशेने पाऊल ः पंतप्रधान मोदी – लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लडाखमधील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे उत्तम प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल आहे. झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग आता अधिक लक्ष केंद्रित करतील, सेवा आणि संधी लोकांच्या आणखी जवळ आणतील. लडाखमधील लोकांचे अभिनंदन.
COMMENTS