अखेर गुरुकुल मंडळाचे सेनापती उतरले मैदानात ; छाननीत 25 अर्ज झाले बाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर गुरुकुल मंडळाचे सेनापती उतरले मैदानात ; छाननीत 25 अर्ज झाले बाद

अहमदनगर/प्रतिनिधी :नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अधिकाधिक रंगत येऊ पाहत आहे. आतापर्यंत पडद्यामागे राहून आपल्या समर्थकांच्या हाती बँके

निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक भागडे
भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर श्रीरामपुरमध्ये जल्लोष
अखेर कामगार वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत

अहमदनगर/प्रतिनिधी :नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अधिकाधिक रंगत येऊ पाहत आहे. आतापर्यंत पडद्यामागे राहून आपल्या समर्थकांच्या हाती बँकेची धुरा देण्याची खेळी करणारे व बाहेर राहून बँकेवर रिमोट कंट्रोल करणारे श्रेष्ठी वा सेनापती आता प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गुरुकुल मंडळाचे प्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर व संजय धामणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील विविध शिक्षक मंडळांच्या श्रेष्ठींपैकी गुरुकुलच्या सेनापती व श्रेष्ठींनी प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उडी घेतल्याने आता त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी अन्य कोणते श्रेष्ठी पुढे येतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. दरम्यान, शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या 852 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. बहुतांश उमेदवारांचे पुरेसे भागभांडवल बँकेत नाही, असे कारण त्यांचे अर्ज बाद होण्यामागे आहे.
शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी येत्या 24 जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 852जणांनी अर्ज भरले आहेत व येत्या 11 जुलैपर्यंत माघारीची मुदत आहे. तोपर्यंत किती उमेदवार माघार घेतात व कितीजण प्रत्यक्ष रिंगणात राहतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. शिक्षक बँकेच्या राजकारणाशी संबंधित 12 मंडळे व संघटना असल्याने त्यांच्यात आपसात जोरदार चुरस सुरू असून, बँकेवर सत्ता आणण्याचा आटापिटा सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

कळमकर…प्रति साने गुरुजी
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे गुरुकुल मंडळाचे प्रमुख असून, त्यांनी स्वतः उमेदवारी दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांना समर्थक शिक्षकांनी प्रती सानेगुरुजी अशी उपमा दिली. ती चर्चेची झाली आहे. कळमकर यांनी नेवासा सर्वसाधारण मतदारसंघातून शिक्षक बँकेसाठी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर समर्थकांच्या झालेल्या मेळाव्यात त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले. डॉ. कळमकरामुळे बँकेची प्रतिष्ठा वाढेल, असे शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी औटी म्हणाले. डॉ. कळमकर यांच्या उमेदवारीमुळे गुरुकुलमध्ये उत्साह असून, आजपर्यंत अनेक लोकांनी शिक्षक बँकेचा उपयोग स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी करून घेतला परंतु डॉ. कळमकर यांच्यामुळे भविष्यात बँकेची प्रतिष्ठा वाढेल असा विश्‍वासही औटी यांनी व्यक्त केला. यावेळी औटी पुढे म्हणाले, साहित्यिक व प्रभावी वक्ते म्हणून कळमकर यांना राज्यभरात मान आहे. आपण मात्र त्यांचा सन्मान करण्यात कमी पडतो. शिक्षक बँकेत अशाच निष्कलंक व चारित्र्यसंपन्न माणसाची गरज आहे. म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी करण्याचा आग्रह केला. संजय धामणे म्हणाले की, कळमकर हे प्रति सानेगुरुजी आहेत. शिक्षक बँकेने त्यांचा होता होईल तेवढा फायदा करून घ्यावा. नितीन काकडे म्हणाले, कळमकर यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. आम्ही गुरुकुल निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू. या वेळेस मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, अनिल आंधळे, वृषाली कडलग, राजेंद्र ठाणगे, भास्कर नरसाळे, संतोष भोपे, विजय अकोलकर, सुखदेव मोहिते, सुनील बनोटे, सीताराम सावंत, माणिक जगताप, इमाम सय्यद, बापू आर्ले, विजय महामुनी, प्रताप पवार, अशोक कानडे, कैलास ठाणगे, सुनील नरसाळे आदींसह शिक्षक उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. जय गुरुकुलच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

25 अर्ज झाले बाद
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या 25जणांचे अर्ज शुक्रवारी झालेल्या छाननीत बाद झाले. अपूर्ण ठेव भागभांडवल, जातीचा दाखला नाही, प्रतिज्ञापत्रावर सही नाही, सूचकाची सही नाही, दुसर्‍या मतदारसंघातून अर्ज अशा विविध कारणांमुळे हे अर्ज बाद झाले आहेत. तसेच 852जणांनी उमेदवारी दाखल केली असली तरी यापैकी अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बाद झालेल्या 25 अर्जांचा हिशेब केल्यावरक 827 अर्ज रिंगणात शिल्लक राहणे अपेक्षित आहे. मात्र, छाननीत एकच अर्ज ठेवला जाणार असून, एका मतदारसंघातील एकाच उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज रद्द होणार आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी (27 जून) अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.

COMMENTS