नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल
नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विविध अटींसह आणि 10 लाख रूपयांच्या जाचमुलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. केजरीवाल तब्बल 177 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. ईडीने केजरीवालांना 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना 26 जून 2023 रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती.
अटकेच्या विरोधात केजरीवाल यांनी जामीन याचिका दाखल केली होती. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांनी (केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडी प्रकरणात 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन न मिळाल्याने ते तुरूंगात होते.
अखेर शुक्रवारी न्यायालयाने त्यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या युक्तीवादात केजरीवाल सहकार्य करत नसल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. आरोपी स्वत:ला दोषी घोषित करेल, अशी अपेक्षा करता येणार नाही, असे न्यायालयाच्याच आदेशात म्हटले आहे. केजरीवाल घटनात्मक पदावर आहेत, त्यांच्या फरार होण्याची शक्यता नाही, पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकत नाही, कारण लाखो कागदपत्रे आणि 5 आरोपपत्रे आहेत. असा युक्तीवाद करण्यात आला होता. केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे रोजी 21 दिवसांसाठी सोडण्यात आले. 51 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची सुटका झाली. 2 जून रोजी केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. केजरीवाल यांची आज म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी सुटका झाली तर ते एकूण 177 दिवस तुरुंगात असतील. यापैकी ते 21 दिवस अंतरिम जामिनावर राहिले. म्हणजेच केजरीवाल यांनी आतापर्यंत एकूण 156 दिवस तुरुंगात काढले आहेत. सीबीआयने 7 सप्टेंबर रोजी राऊस व्हेन्यू कोर्टात पाचवे आणि शेवटचे आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने सांगितले की, तपास पूर्ण झाला असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दारू धोरण तयार करण्याच्या आणि अंमलात आणण्याच्या गुन्हेगारी कटात सुरुवातीपासूनच सहभागी असल्याचे समोर आले आहे. मद्य धोरणाचे खाजगीकरण करण्याचे त्यांनी आधीच ठरवल्याचा आरोप सीबीआयने केजरीवाल यांच्यावर ठेवला आहे.
‘या’ चार अटीवर दिला जामीन
1. केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत.
2. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही.
3. तपासात अडथळा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.
4. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करेल.
‘आप’ला हरियाणात फायदा होणार का ? – केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत केजरीवाल आपल्या पक्षाचा प्रचार करतील, त्यामुळे आपला फायदा होण्याची शक्यता आहे. हरियाणातील सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. हरियाणात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती नाही. आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. अशा स्थितीत केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. केजरीवाल यांच्याकडे प्रचारासाठी जवळपास 25 दिवस असतील. त्यांना सहानुभूतीची मते मिळू शकतात.
COMMENTS