नवी दिल्ली : इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ तेल व वायूच्या किमतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा मोठा फटका शेती क्षेत्रालाही बसण्याची शक

नवी दिल्ली : इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ तेल व वायूच्या किमतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा मोठा फटका शेती क्षेत्रालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, या संघर्षामुळे खतांच्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे येत्या काही महिन्यांत अन्न उत्पादन कमी होण्याची तसेच महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील शेतकर्यांमध्येही चिंता वाढू लागली आहे.
भारत शेतीसाठी लागणार्या खतांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. मध्यपूर्वेतील देशांकडून मोठ्या प्रमाणात खतांची उपलब्धता होत असते. परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांकडून होणार्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खतांचा पुरवठा कमी झाल्यास शेतीचा खर्च वाढेल, उत्पादन घटेल आणि त्याचा परिणाम भविष्यात अन्नधान्यांच्या किमतींवरही होऊ शकतो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मध्यपूर्वेतील देशांचे मोठे योगदान आहे. या प्रदेशात केवळ तेलच नव्हे तर युरिया, गंधक आणि अमोनिया यांसारख्या महत्त्वाच्या खत घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. इराण हा अमोनिया उत्पादनात अग्रस्थानी असलेला देश मानला जातो. हे घटक पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. युद्ध लांबल्यास या देशांतील उत्पादन आणि समुद्री मार्गाने होणारी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या शेती हंगामापूर्वी खतांचा पुरवठा खंडित झाला तर शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात दिसू लागला आहे. समुद्री वाहतूक मार्गांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून काही कारखान्यांतील उत्पादनातही घट झाली आहे. युरोपमध्ये अमोनियाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मध्यपूर्वेत युरियाचे दरही वाढू लागले आहेत. जगातील प्रमुख खत निर्यातदार देशांकडून तुटवडा भरून काढण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे. काही देशांनी निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे जागतिक बाजारात खतांचा तुटवडा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. खताच्या टंचाईमुळे उत्पादन घटल्यास बाजारात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागतिक तणावाचा फटका शेवटी सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारत करतो दरमहा 20 लाख टन खतांची आयात
भारत दरमहा सुमारे वीस लाख टन खतांची आयात करतो. काही प्रकारच्या खतांसाठी तर आयातीवरील अवलंबित्व पूर्णपणे आहे, तर काहींसाठी ते अर्ध्याहून अधिक आहे. मागील आर्थिक वर्षात केंद्र सरकारने खत अनुदानासाठी मोठा खर्च केला होता. आता पुरवठा खंडित झाला तर खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जर खतांचे दर वाढले किंवा उपलब्धता कमी झाली तर शेतकर्यांचा शेती खर्च वाढेल. परिणामी काही शेतकरी खतांचा वापर कमी करतील किंवा कमी उत्पादन देणार्या पिकांकडे वळतील. या परिस्थितीचा थेट परिणाम धान्य उत्पादनावर होऊ शकतो.

COMMENTS