बीड प्रतिनिधी - धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या मार्गावर;रहेमत नगरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते! जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक
बीड प्रतिनिधी – धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या मार्गावर;रहेमत नगरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते! जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे या शीर्षकाने बातमी प्रकाशित झाल्यानंतर बीड नगर परिषदेने भिंत पाडण्याची कारवाई न करता इमारतीच्या बाजूचा रस्ताच बॅरिकेट्स लावून बंद करून टाकला. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने लोकांनीच येथील बॅरिकेट्स उचलून गल्लीच्या कोपर्याला नेऊन ठेवल्याचे दिसून आले. यावर दुखणे म्हशीला इंजेक्शन पखालीला असे नागरिक म्हणू लागले आहेत.
शासकीय-प्रशासकीय पातळीवर कधी कोणते निर्णय घेतले जातील त्याचा नेम नसतो. कधी-कधी जे आवश्यक ते न करता भलतेच काहीतरी केले जाते. असाच प्रकार सध्या बीड शहरात दिसून आला. शहरात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असून मोठ्या भिंतीला भले मोठे भगदाड पडले आहे व सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ही भिंत जर पडली तर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय येथून नवीन भाजी मंडई जवळ असल्याने इतर दिवशी तर नाही मात्र रविवारच्या दिवशी ग्रामीण भागातील शेतकरी आपापला भाजीपाला आणून या भिंतीला चिटकून दिवसभर बसून विकतात. जर अशाच एखाद्या दिवशी ही भिंत पडली तर मोठी अनुचित व अप्रिय घटना घडू शकते. याचे गांभीर्य जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांनी जाणून घेणे अपेक्षित आहे. अन्यथा भिंत पडून काही अघटीत घडले तर याची जबाबदारी सर्वस्वी या उच्चपदस्थ अधिकार्यांवर येईल. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही भिंत लवकरात लवकर पाडून संभाव्य धोका टाळणे आवश्यक आहे. बॅरिकेट्स लावून लोकांची गैरसोय करण्यापेक्षा प्रशासकीय पातळीवर कारवाई करून ही भिंत पाडणे कधीही चांगले असे लोक म्हणू लागले आहेत. याची दखल जबाबदार अधिकार्यांनी घेणे आवश्यक असल्याचे मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केलेे आहे.
COMMENTS