इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात लोकांचे मला दिवसेंदिवस वाढणारे पाठबळ पाहून पराजयाच्या भीतीने विद्यमान आमदारांच्या पोटात गो
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघात लोकांचे मला दिवसेंदिवस वाढणारे पाठबळ पाहून पराजयाच्या भीतीने विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा आल्याने ते आता जनतेकडे भावनिक होऊन मते मागत आहेत. पण सुज्ञ जनता त्यांच्या भुलभुलैय्यला भाळणार नाही. मतदारांनी यावेळी भाकरी परतवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे या मतदार संघात सर्वांनी परिवर्तनाची साद घातली आहे, असे प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. इंद्रिस नायकवडी, आनंदराव पवार, जयवंत पाटील, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, केदार पाटील, सागर मलगुंडे, अशोक खोत प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, मी काम करणारा मनुष्य आहे. मला भावनिक होऊन मते मागता येत नाहीत. दुसर्याची रेष पुसण्यापेक्षा माझी रेष मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसर्या बाजूला सातत्याने 35 वर्षे तुम्ही ज्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहिला, त्यांनी तुमचा विकास केला का? याचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करा. आपला जन्म कोणाला तरी आमदार व खासदार करण्यासाठी झाला नाहीतर आपला प्रपंच मोठा करण्यासाठी झाला आहे. गावाचा माणूस आमदार होतो, तो अभिमान वेगळा असतो. उरुणातील जनता स्वाभिमानी आहे. ज्यांनी तुंगाच्या सभेत उरुणातील माणसाची मापे काढली, त्यांना ती निश्चित या निवडणुकीत धडा शिकवेल. विरोधकांनी केवळ आपल्या पै-पाहुणे व बगलबच्चांचा विकास साधला. क्षारपड जमीन सुधारणासाठी आलेला 93 कोटी निधी यांनी मागे घालवून शहरातील शेतकर्यांवर त्यांनी अन्याय केला. शहरातील शेतकर्यांचा लाखो टन ऊस त्यांच्या कारखान्याला जातो. पण या शेतकर्यांना त्यांनी सभासद केले नाही. मी महायुती सरकारच्या माध्यमातून शहरालगतच्या पाणंद रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. समाज मंदिरे स्वखर्चातून उभारली. माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष काळात शहराचा चौफेर विकास साधला. आता इस्लामपूर मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मला या निवडणुकीत आशिर्वाद द्या व जिल्ह्यातील राजकारण दूषित करणार्याचे समूळ उच्चाटन करा.
आनंदराव पवार म्हणाले, नगरपालिकेची सत्ता तुम्ही आमच्या हातात दिली. आम्ही तुमच्या विश्वासास पात्र राहून महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर शहराचा विकास केला. येणार्या काळात महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे. इस्लामपूर मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर निशिकांतदादांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. आपण त्यांच्या पाठीशी मतदान रुपी ताकद उभा करूया.
COMMENTS