मुंबई :मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात संवादाची दारे माझ्याकडून नव्हे तर त्यांच्याकडूनच बंद करण्यात

मुंबई :मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात संवादाची दारे माझ्याकडून नव्हे तर त्यांच्याकडूनच बंद करण्यात आली होती, असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि भाजपमधील दुराव्याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
2019 नंतरच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, अनेक वर्षे सोबत काम केल्यानंतर वेगळा मार्ग स्वीकारायचा असेल, तर किमान संवाद साधण्याची शिष्टाचाराची अपेक्षा असते. मी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. या प्रयत्नांचे साक्षीदार एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गाच्या श्रेयाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ज्या प्रकल्पाला विरोध झाला, त्याचे श्रेय घेण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो? या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात एकनाथ शिंदेंचे योगदानही महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. ‘मातोश्रीची बदनामी थांबवा’ या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केलेली नाही. मी विरोधी पक्षनेता असतानाही वैयक्तिक आरोप टाळले. सार्वजनिक जीवनात ‘बिलो द बेल्ट’ राजकारण मला मान्य नाही, असे त्यांनी नमूद केले. याच मुद्द्यावर पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, त्यांच्या विरोधकांकडील काही घटकांनी त्यांच्या पत्नीविषयीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पुरावे असूनही संयम राखला, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे गटाबाबत बोलताना ते म्हणाले की, संघटनात्मकदृष्ट्या शिवसेनेचा कणा एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर दुसर्या गटाकडे नेतृत्व आणि ताकद कमी पडताना दिसत आहे. युतीनंतर अनेक वॉर्डांत लढत एकतर्फी झाली, असा दावा त्यांनी केला.
मुंबईच्या विकासासाठी प्राधान्य
आता कोणत्याही राजकीय दाराची गरज उरलेली नाही. माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांच्या मनातील विश्वास, असे सांगत त्यांनी ‘मातोश्री’शी पुन्हा जवळीक होण्याची शक्यता पूर्णतः फेटाळून लावली. महापालिका निवडणुकांतील उमेदवार निवडीवर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. काही ठिकाणी विरोधकांना उमेदवारच सापडले नाहीत. उमेदवार देणार नसतील, तर आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार उभे करायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS