नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौर्यादरम्यान प्रोटोकॉल नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून केंद्र आणि राज्य सरक

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौर्यादरम्यान प्रोटोकॉल नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांवरून केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरण मागितले असून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय गृहसचिवांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून राष्ट्रपतींच्या दौर्यावेळी प्रोटोकॉल आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत ठरवलेल्या नियमांचे पालन झाले की नाही, याबाबत माहिती मागवली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा आणि कार्यक्रम व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेल्या गोपनीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या आगमनावेळी राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित नसल्याची बाबही केंद्राने नोंदवली आहे. अशा वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांसारख्या वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती अपेक्षित असते. मात्र स्वागतासाठी केवळ सिलीगुडीचे महापौर उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला प्रोटोकॉलच्या दृष्टीने गंभीर बाब मानले जात आहे. दरम्यान, बागडोगरा विमानतळाजवळ आयोजित आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या कमी असल्याबद्दलही राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. सुरुवातीला हा कार्यक्रम सिलीगुडीतील बिधाननगर येथे होणार होता; मात्र नंतर तो बागडोगरा परिसरातील गोशाईपूर येथे हलवण्यात आला. या निर्णयामुळे कार्यक्रमस्थळी लोकांची उपस्थिती कमी राहिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय राष्ट्रपतींसाठी तयार केलेल्या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसल्याची आणि त्यांच्या मार्गावर स्वच्छतेचा अभाव दिसल्याची बाबही समोर आली आहे. या सर्व घटनांबाबत केंद्राने राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, याची माहितीही मागितली आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे केंद्र सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS