Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युद्धजन्य परिस्थितीमुळे नांदेड शहरांमध्ये हॉटेल, वस्तीगृहे यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा; विद्यार्थी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता

नांदेड : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता देशातील शहरांवरही दिसू लागला असून नांदेड जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर

उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त
नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

नांदेड : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता देशातील शहरांवरही दिसू लागला असून नांदेड जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. इराण-इझ्राईल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिणामी हॉटेल व्यवसाय, खानावळी तसेच विविध उद्योगधंद्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सध्या शहरातील हॉटेल, खानावळी आणि लहान-मोठे व्यावसायिक उपक्रम यांच्याकडे असलेला गॅस साठा अत्यंत मर्यादित आहे. अनेक ठिकाणी हा साठा एक-दोन दिवसांत संपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नसला तरी त्याच्या बुकिंग कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 15 दिवसांच्या अंतराने सिलेंडर बुक करता येत होते; मात्र आता हा कालावधी 25 ते 30 दिवसांपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धजन्य परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास घरगुती गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड शहरात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. शहरातील शेकडो हॉटेल्स, खानावळी, चहा-नाश्त्याची केंद्रे आणि लहान खाद्यव्यवसाय पूर्णपणे व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत. अचानक पुरवठा बंद झाल्याने या सर्व व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. व्यावसायिकांच्या मते, गॅसशिवाय स्वयंपाक करणे अशक्य असल्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या रोजगारावर तसेच हॉटेलच्या भाडे, वीजबिल आणि इतर खर्चांवर होणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. नांदेड शहर मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. शहरात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास असून त्यापैकी अनेक विद्यार्थी खानावळींवर जेवणासाठी अवलंबून असतात. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने अनेक खानावळींमध्ये स्वयंपाक करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी सिलेंडरअभावी स्वयंपाक मर्यादित प्रमाणात केला जात आहे, तर काही खानावळी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या काही वितरकांकडे मर्यादित प्रमाणातच गॅस उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. 7 मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण थांबल्यामुळे उपलब्ध साठाही झपाट्याने कमी होत आहे. या परिस्थितीत उद्योगधंदे, लहान व्यवसाय तसेच खानावळी चालविणार्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास शहरातील अनेक व्यावसायिक उपक्रम ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. प्रति सिलेंडर सुमारे 60 रुपयांची वाढ झाल्याने 879 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 939 रुपयांना मिळत आहे. तसेच वाहनांसाठी वापरल्या जाणार्‍या सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली असून दर 62 रुपयांवरून 82 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. उज्ज्वला गॅसचे व्यवस्थापक विद्यासागर दांडेगावकर यांनी सांगितले की, ग्राहकांनी गॅस कनेक्शनसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, तसेच हॉटेल आणि खानावळींच्या अडचणी लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी शासनाकडे केली आहे. अन्यथा या संकटाचा परिणाम केवळ व्यवसायावरच नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावरही होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS