Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ‘नाम’ची ऊर्जा वाढवणारा : नाना पाटेकर

सातारा नगरपालिकेतर्फे पुण्यात पुरस्काराचे वितरणसातारा / प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खा. श्र

भास्कर गँगकडून प्लॉटसाठी धमकी : पाच अटकेत
आ. गोरेंना तत्काळ अटक करा; अन्यथा 25 ला आंदोलन; जनता क्रांती दलाचा इशारा
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री

सातारा नगरपालिकेतर्फे पुण्यात पुरस्काराचे वितरण
सातारा / प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या सातारा नगरपालिकेने यापूर्वी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या महनीय व्यक्तींना डॉ. नरेद्र दाभोळकर स्मृती पुरस्काराने गौरवले आहे. सातारा नगरपालिकेने यावर्षी या पुरस्कारासाठी आमच्या ‘नाम’ फौंडेशनची निवड केली, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. नाम फौंडेशनसाठी महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांची या पुरस्कारामुळे ऊर्जा वाढणार आहे, अशा शब्दात प्रख्यात अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते व नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी पुरस्काराविषयी गौरवोद्गार काढले.
सातारा नगरपालिकेतर्फे चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्काराने गौरवले जाते. यावर्षी ‘नाम’ फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोघेही खास सेलिब्रेटी असल्याने सातार्‍यात ते आले तर गर्दी प्रचंड उसळणार. त्यामुळे कोरोनाचा धोकाही गर्दीमुळे वाढणार हे लक्षात घेवून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व नगरपालिकेचे प्रशासक अभिजीत बापट यांच्यामध्ये चर्चा झाली. पुरस्कार निवड समितीच्या उपस्थितीत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी नाम फौंडेशनच्या कार्यालयात अवघ्या 15 लोकांच्या उपस्थितीत पुरस्कार निवड समितीतर्फे सातारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या हस्ते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सातारी कंदी पेढे, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, गणेश थोरात यावेळी उपस्थित होते.
अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, केवढा इतिहास आहे रे सातार्‍याला. निसर्गाने नटलेला सातारा हा माझा जिल्हा आहे. मला ऐकून खूप छान वाटले. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अनेक महत्वकांक्षी योजना सातार्‍यात पूर्णत्वाला नेल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सातार्‍याला मोठे महत्व आहे. सातार्‍यात यावे वाटते. उदयनराजे आणि माझी जुनी मैत्री आहे. खूप महत्वकांक्षी व व्हिजन असलेले लिडर आहेत उदयनराजे. सातार्‍याने खरे तर उदयनराजेंना जपले पाहिजे, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले.
मकरंद अनासपुरे म्हणाले, सातारा नगरपालिकेने दिलेला हा पुरस्कार नाम फौेंडेशनसाठी अभिमानास्पद आहे. सातारा नगरपालिकेने स्वच्छतेच्या व पर्यावरणाच्या बाबतीत देशात नाव मोठे केले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराचीच नव्हे तर सातारा जिल्ह्याची वाटचाल अत्यंत गौरवशाली होत आहे. कचरा निर्मूलन, पर्यावरण, वृक्ष लागवड या क्षेत्रात सातार्‍याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सातार्‍याचा औद्योगिक विस्तार झाला पाहिजे, यासाठी उदयनराजेंनी प्रयत्न करावे. नाना पाटेकर व मी नाम फौंडेशनच्या माध्यमातून सातार्याला मदत करायला तयार आहोत, अशी ग्वाहीही मकरंद अनासपुरे यांनी दिली.
प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी सातारा शहरातील विकासात्मक व्हिजनबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट यांनी सातारा नगरपालिका करत असलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची माहिती नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना दिली. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळावर विश्‍वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा तर सातारा जिल्हा पत्रकारितेत सामाजिक कार्य करत असल्याबद्दल हरीष पाटणे यांचा नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्वत:हून सत्कार केला.

COMMENTS