पैसे खाल्ल्याच्या आरोपाने संचालक व चेअरमनमध्ये वाद ; नगर अर्बन बँकेची अब्रू चव्हाट्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैसे खाल्ल्याच्या आरोपाने संचालक व चेअरमनमध्ये वाद ; नगर अर्बन बँकेची अब्रू चव्हाट्यावर

अहमदनगर/प्रतिनिधी : तब्बल 112 वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 5-6 गुन्हे दाखल झाल्याने आधीच बदनाम

आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पुकारले कामबंद आंदोलन
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
अहिल्यादेवींच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे

अहमदनगर/प्रतिनिधी : तब्बल 112 वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 5-6 गुन्हे दाखल झाल्याने आधीच बदनाम झालेल्या या बँकेतील नव्या संचालक मंडळातील वादही आता या बदनामीत भर घालू लागले आहेत. कर्जत तालुक्यातील खातेदार व ठेवीदारांनी त्यांच्या पैशांसाठी मंगळवारपासून सुरू केलेल्या उपोषणस्थळी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व संचालक गिरीश लाहोटी यांच्यात जाहीर व माईकवर वाद रंगले. दोन प्रकरणात लाहोटींच्या वडिलांनी 2 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला तर त्यांच्याकडे याचे पुरावे असतील तर, त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावे व गुन्हा दाखल करावा, असे आव्हान लाहोटी यांनी त्यांना दिले. मात्र, या प्रकाराने बँकेची अब्रू चव्हाट्यावर आली असून, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे आधीच वैतागलेल्या संचालक मंडळातील वादही आता विकोपाला जाण्याच्या स्थितीत आहेत. कर्जत तालुक्यातील व्यावसायिक व व्यापार्‍यांची करंट व सेव्हींग्ज खाती त्या तालुक्यातील बँकेच्या शाखांमध्ये आहेत व त्यावरून त्यांचे व्यापारी व्यवहार आणि व्यावहारिक पैशांची देवाण-घेवाण ऑनलाईन होते. मात्र, बँकेच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्याने 6 डिसेंबर 2021पासून बँकेच्या कोणत्याही खात्यावर सहा महिन्यात फक्त 10 हजार रुपयांचेच व्यवहार करता येतात. त्यामुळे कर्जतमधील व्यापार्‍यांचे सुमारे 10 कोटी रुपये त्यांच्या खात्यांमध्ये अडकून पडले आहेत. ते मिळावेत वा ती खाती सुरू करून त्यावरील ऑनलाईन व्यवहार सुरळीत करण्याची त्यांची मागणी आहे व त्यासाठी त्यांनी बँकेच्या नगरमधील मुख्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष अग्रवाल व संचालक लाहोटी यांच्यात जाहीर वाद झाले. यावेळी बँकेचे संचालक अनिल कोठारी, बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी, सदस्य सदाशिव देवगावकर, वसंत लोढा, उपोषणास बसलेले महेश जेवरे व अन्य खातेदार उपस्थित होते. अग्रवाल व लाहोटींतील वाढत असलेले वाद पाहून अखेर बँकेच्या अधिकार्‍यांनी अग्रवालांना बँकेत नेले.

पैसे खाल्ले…निष्क्रीय आहेत
यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी चेअरमन अग्रवाल व संचालक कोठारी तेथे आले होते. त्यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व तेथूनच रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांना फोन लावले. त्यावेळी त्या अधिकार्‍यांनी, आधी बँकेची थकीत वसुली करण्याचा सल्ला अग्रवाल यांना दिला. या दरम्यान संचालक गिरीश लाहोटी तेथे आले व त्यांनी, बँकेचे चेअरमन निष्क्रीय आहेत, त्यांचा कारभार पारदर्शी नाही, बँकेला पूर्ववत ट्रॅकवर आणण्यात ते अपयशी झाले आहेत, मागील जून महिन्यात त्यांनी संचालक मंडळाची बैठकच घेतली नाही, आम्ही थकीत वसुलीचा आग्रह करीत असूनही ते गांभीर्य दाखवत नाहीत, असे जाहीर आरोप माईकवर केले. त्यावेळी उपोषणकर्त्यांशी खाली बसून चर्चा करणारे चेअरमन अग्रवाल जागेवरून उभे राहिले व त्यांनीही माईक हाती घेऊन संचालक लाहोटी यांचे वडील केदार लाहोटी यांच्यावर आरोप केले. तुळजाभवानी संस्थेच्या थकीत रकमेबाबत वनटाईम सेटलमेंट करण्यासाठी 1 कोटी घेतले तसेच जालन्याच्या बगाडिया कर्ज प्रकरणात लाहोटींच्या खात्यात 1 कोटी रुपये आले, असा दावा त्यांनी केला. माईकवर जाहीरपणे झालेल्या या आरोपांनी तेथे खळबळ उडाली. लाहोटी व अग्रवाल यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे मग बँकेच्या अधिकार्‍यांनी अग्रवाल यांना बँकेत नेले तर लाहोटी तेथून निघून गेले. याबाबत गिरीश लाहोटी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप अग्रवाल करीत असतील तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा व उघड आरोप करून ते सिद्ध करावेत आणि पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. त्यांच्याकडे पुरावे नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले. चेअरमन हे निष्क्रीय आहेत, मागील महिन्यात त्यांनी संचालक मंडळ बैठक घेतली नाही, बँकेचे बायलॉज पायदळी तुडवण्याचे काम ते करीत आहेत, त्यांच्या पाठीशी किती संचालक आहेत?, कोरम होणार नाही म्हणून ते मिटींगच घेत नाहीत, थकीत वसुलीबाबत मोहीम सुरू करण्याचा आग्रह धरूनही त्याची कार्यवाही ते करीत नाहीत. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आधी या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान गिरीश लाहोटी यांनी चेअरमन अग्रवाल यांना दिले. दरम्यान, याबाबत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोेन घेतला नाही. तर उपस्थित संचालक अनिल कोठारींशी संपर्क साधला असता लाहोटी व अग्रवाल यांच्यात किरकोळ वाद झाल्याचे ते म्हणाले. आम्ही संचालक मंडळाने मागील 7 महिन्यात 120 कोटींची वसुली केली आहे. रिझर्व्ह बँकेची बंधने बँकेच्या अधिकार्‍यांवर आहेत. त्यामुळे आम्ही संचालकांनी जरी ठेवीदार व खातेदारांचे पैसे देण्यास अधिकार्‍यांना सांगितले तरी रिझर्व्ह बँकेच्या बंधनामुळे त्यांनाही काही करता येत नाही, असा दावाही कोठारी यांनी केला. दरम्यान, बँकेच्या पदाधिकार्‍यांमध्ये सुरू झालेल्या वादामुळे बँकेचा कारभार पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे.

इतिहासातील काळा दिवस : गांधी
बँकेच्या इतिहासातील काळा दिवस… चेअरमन व संचालकांत रस्त्यावर बाचाबाची, एकमेकांवर गंभीर आरोप व असल्या गैरप्रकाराचा बँक बचाव समितीतर्फे जाहीर निषेध, अशी प्रतिक्रिया बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, बँकेचे ठेवीदार व खातेदार आपले हक्काचे पैसे परत मिळत नाहीत म्हणून हवालदिल होऊन आमरण उपोषणास बसल्याचा बिकट प्रसंग असताना व चेअरमन राजेंद्र अग्रवाल उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत असताना सोबत संचालक अनिल कोठारी पण होते. त्याच वेळी बँकेचे संचालक गिरीश लाहोटी उपोषणस्थळी आले व त्यांनी बँकेच्या चेअरमनवर निष्क्रियतेचे आरोप केले व बँकेत संचालकांना ते काम करू देत नसल्याचे सांगितले. त्यावर चेअरमन अग्रवाल यांनी गिरीश लाहोटी यांचे वडील केदार लाहोटी यांच्यावर काही कर्जदारांकडून मोठी रक्कम घेतल्याचे आरोप केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्वच उपस्थित अवाक झाले. खरे तर ठेवीदारांच्या उपोषणासारख्या गंभीर व दुर्दैवी प्रसंगी असे घडायला नको होते व इतक्या बेजबाबदार मंडळींच्या हाती बँकेचे भविष्य कसे सुरक्षित राहील, याची काळजी वाटते. उपोषणास बसलेले ठेवीदार डोळ्यात पाणी आणून बोलत असताना असल्या गैरप्रकाराचा बँक बचाव समितीतर्फे जाहीर निषेध, अशी भावनाही गांधी यांनी व्यक्त केली.

COMMENTS