एकाच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात आलेले दोन देश म्हणजे भारत-पाकिस्तान. भारताने नेहमीच विकासाची मुहूर्तमेढ रोवत, आपल्या देशाला विकास
एकाच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात आलेले दोन देश म्हणजे भारत-पाकिस्तान. भारताने नेहमीच विकासाची मुहूर्तमेढ रोवत, आपल्या देशाला विकास-तंत्रज्ञान, अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासह पायाभूत सोयी-सुविधांवर नेहमीच भर दिला. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच दबदबा राहिलेला आहे. अमेरिका, ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तानसह युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईस गेल्यानंतर देखील भारतीय अर्थव्यवस्था ताठ मानेने उभी आहे, याचे यश भारताने नेहमीच चोखाळलेली वाट, यातून दिसून येते. मात्र भारताचा शेजारी राष्ट्र असणारे पाकिस्तान नेहमीच धर्मांध भूमिकेचा आणि दहशतवाद्याचा पुरस्कार करत आलेले आहे. अनेक दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देणे, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तळे उभारणे, त्याचबरोबर लष्कराचे असलेले राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण या सर्व बाबींमुळे पाकिस्तान नेहमी विकासाच्या दिशेने पाऊल टाकू शकलेला नाही.
शिवाय पाकिस्तान नेहमीच चीनच्या कच्छपी लागून, मोठया प्रमाणावर शस्त्रास्त्र खरेदी करून, मोठया प्रमाणावर चीनकडून कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आज सर्वसामान्य माणूस आपली भूक भागवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सावरण्याची किंवा स्थिर होण्याची कोणतीही शक्यता नाही. पाकिस्तानमधले राजकारणही विषारीच राहील आणि इथल्या राजकारण्यांकडे देशाच्या समस्यांवर काही उपाय शोधण्याची कोणतीही योजना नाही, असेही दिसत आहे. पाकिस्तानला सावरण्यासाठी सध्यातरी कणखर असे नेतृत्व नाही. इम्रान खान हे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप असले तरी (सेक्स टेप्स, आर्थिक गैरव्यवहार, मित्रांवर मेहेरनजर) त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. पण तरीही त्यांना पंतप्रधान होऊ दिले जाणार नाही यावर पाकिस्तानातील पंडितांचे एकमत आहे.
नवीन लष्करी नेतृत्व इम्रान खान यांच्यावर नाराज आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी राजकारणातील एक घातक शक्ती म्हणून पाहिले जाते. त्यांचे राजकारण हे विनाशकारी आणि सूड प्रवृत्तीचे आहे, असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्याविरोधात पंडितांसोबत तेथील लष्कर देखील आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे राजकारणातील परतीचे दोर कापून टाकण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी पाकिस्तानचे सरकार हतबल झाल्याचे दिसून येत आहे. दूध, साखर, गहू, तांदूळ, टोमॅटो, कांदे या रोजच्या जगण्यातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानसारखा देश आता इतर देशांसमोर हात पसरतांना दिसून येत आहे. भारतासमोर देखील त्याने याचना करत मदत मागितली आहे. पाकिस्तान अडचणीत असल्यामुळे त्याला मदत करण्यात अडचण नाही.
मात्र पाकिस्तान हा भरवश्याचा देश नाही. परिस्थिती सुधारली की, तो नेहमीच वार करणारा देश म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानची अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहे हे लष्कराला चांगलेच माहीत आहे. पण हे निवडणुकीचे वर्ष असल्याने सत्ताधारी राजवटीला आपले हरवलेले राजकीय भांडवल परत मिळवण्यासाठी काही प्रचारकी गोष्टींमध्ये पाकिस्तानी राजकारणी अडकून पडतांना दिसून येत आहे. वास्तववादी दृष्टीकोन स्वीकारण्याऐवजी ते पाकिस्तानला पुन्हा एकदा स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातांना दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुका जश-जशा जवळ येत आहे, तस-तसे पाकिस्तान सरकार दिवाळखोरीचे आणि उधळपट्टीचे निर्णय घेतांना दिसून येत आहे. तसंच आपल्या मतपेढ्या आणि पारंपरिक मतदारसंघ टिकवण्यासाठी सरकार मोफत सवलतींचीही लयलूट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. एकीकडे इतर देशांकडे मदतीचा हात मागायचा, तर दुसरीकडे आपल्याच देशात मतदानांसाठी सवलतींची लयलूट करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला जातांना दिसून येत आहे.
COMMENTS