रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ! देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत गौण खनिज माफियांची दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे.
रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ!
देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत गौण खनिज माफियांची दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे. चोथे वस्ती ते गणपती मंदिर चौक या मुख्य रस्त्यावर काल रात्री अज्ञात गौण खनिज चोराने महसूल व पोलीस प्रशासनाला थेट आव्हान देत हायवामधून डांबरी रस्त्यावर कारगळ मुरूम ओतून दिला आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. हा माफिया चोथे वस्ती ते शेटेवाडीतील खांदे वस्तीपर्यंत रस्त्यावर मुरूम सांडत पळून गेला, मात्र त्यामागे राहिला तो अपघातांचा आणि भीतीचा थरार. रस्त्यावर पडलेल्या मुरूमामुळे चार ते पाच दुचाकीस्वारांचे अपघात झाले. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रश्न एकच – याची जबाबदारी कोणाची?
रात्रीच्या अंधारात माफिया बेधडक फिरतो, रस्त्यावर मृत्यूचे सापळे उभे करतो आणि प्रशासन कुठे आहे? हा थरार सुरू असताना एकही पोलीस गाडी, महसूल पथक किंवा खनिज विभागाचा अधिकारी घटनास्थळी दिसला नाही, ही बाब अधिक धक्कादायक आहे. या घटनेची माहिती गणेश खांदे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासन जे करू शकले नाही ते नागरिकांच्या मदतीने संतोष चोळके यांनी केले. नगरपालिकेचा जेसीबी बोलावून रस्त्यावर सांडलेला मुरूम बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. संतप्त संतोष चोळके यांनी जिल्हा गौण खनिज अधिकारी दिव्या वर्मा यांना फोन करून थेट इशारा दिला. गौण खनिज माफिया आणि चोरांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर तहसीलदार यांच्या तोंडाला काळे फासू, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. यावेळी मच्छिंद्र चोथे, गणेश खांदे, गोवर्धन शेटे, गणेश तांबे, डॉ. शुभम चोथे यांच्यासह संतप्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळाली प्रवरा परिसरात गौण खनिज चोरीला प्रशासनाचा आशीर्वाद आहे का? असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

COMMENTS