Homeताज्या बातम्यासंपादकीय

धर्मापेक्षा लोकशाही मोठी! 

संस्कृती ही कोणत्याही धर्माची किंवा जात समूहाची किंवा पंथाची नसते; तर, ती देशाची असते.  संस्कृतीवर कोणतीही चर्चा लोकशाही व्यवस्थेमध्ये होणं, हे ख

भांडवलशाही च्या अनागोंदीला मिटवण्याचे आवाहन करित ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर 
बंदिस्त मनाचा खुला वर्ग !
एआयडीएमके आणि भाजप युतीला सुरूंग का?

संस्कृती ही कोणत्याही धर्माची किंवा जात समूहाची किंवा पंथाची नसते; तर, ती देशाची असते.  संस्कृतीवर कोणतीही चर्चा लोकशाही व्यवस्थेमध्ये होणं, हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे. काल-परवा एका राजकीय नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणे, एखाद्या धर्मगुरूंनी त्यांची मान छाटण्याची भाषा करणे आणि त्याचवेळी  एखाद्या संघटनेने जाहीरपणे त्यांचे तोंड काळ करण्याचे आव्हान करणे, या सगळ्या गोष्टी वैचारिक चर्चा नाकारणाऱ्या आहेत. खरेतर, यापूर्वी शाकाहार – मांसाहार याची सामाजिक पातळीवर चर्चा होत असते. मुंबईसारख्या महानगरामध्ये अनेक वेळा शाकाहारी आणि मांसाहारी अशा सोसायटी आणि वसाहती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो; या विरोधात शिवसेनेचे उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे असो किंवा तमाम सर्व राजकीय पक्षांचे नेते असोत, त्यांनी या गोष्टीला कायम विरोध केला आहे. कारण, भारतीय समाज हा शाकाहारी आणि मांसाहारी असा विभागला गेलेला नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये माणूस हा एकत्रित कुठेही राहू शकतो आणि माणसाची आजची जी संस्कृती आहे त्याला पुरातन काळाच्या इतिहासाची साक्ष आहे. रामायणावर अनेक ग्रंथ आपल्या देशात आहेत. प्रत्येक रामायणामध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण अशा चर्चा आहेत, वर्णन आहे! त्या वर्णनावर चर्चा होण्यापेक्षा ते समजून घेणे, हे अधिक महत्त्वाचं आहे. कोणी यावर जेव्हा बोलतात तेव्हा ते अभ्यासपूर्ण बोलतात, परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी तितकीच अभ्यासपूर्ण वक्तव्य झाली पाहिजे. त्यावर झुंडशाही पद्धतीने उत्तर दिले जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील तमाम बहुजनांचे उदाहरण घेतलं तर, बहुजनांच्या सर्वच देवता जवळपास मांसाहार चालणाऱ्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची कुलदैवत असणारे खंडोबा किंवा कुलदैवत असणाऱ्या देवी असो, या सगळ्यांच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात कधी बोकडाचा तर कधी कोंबड्याचा मान असतो. त्यामुळे या देवता खासकरून मांसाहारी आहेत. बहुजन समाजाच्या देवता जर मांसाहारी आहेत तर, बहुजन समाजाची सर्वाधिक श्रद्धा ज्या देवांवर असेल तेही निश्चितपणे मांसाहारी असतील! कारण, संस्कृतीचं नातं हे नेहमीच आहार, विहार, आचरण या सगळ्याच गोष्टींशी जुळलेले असते. इतिहासामध्ये, पुरातन काळामध्ये त्याच्या खानाखुणा या दडलेल्या असतात. त्या योग्य त्या चर्चेने बाहेर काढणे, हे खरे तर महत्त्वाचे आहे. आपल्या देशाच्या इतिहासाने, हे वारंवार मांडलेले आहे. यापूर्वी देखील भारतात मांसाहार करणारी लोक नेमकी कोण होते, कोणता समुदाय होता आणि आता कोणता समुदाय आहे, या संदर्भात अनेक चर्चा, वादविवाद यापूर्वी झालेल्या आहेत. त्यावर चर्चा करण्याऐवजी  झुंडशाही आणि हिंसक भाषा करणे, हे जेव्हा समोर येतं तेव्हा, आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये धर्म व्यवस्था ही मजबूत झाली आहे की लोकशाही व्यवस्था मजबूत झाली आहे, याचा संभ्रम होतो. त्यावर लोकांना हे कळायला पाहिजेच की, आपल्याला बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीमध्ये जर असेल, व्यक्त होण्याचा अधिकार असेल,  काही मांडण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असेल तर तो निश्चितपणे देशाच्या प्रत्येक व्यक्तीला आहे. परंतु, अशा कुठल्याही कृत्यामधून किंवा वक्तव्यांमधून सामाजिक सलोखा धोक्यात येईल किंवा तशा प्रकारच्या परिस्थितीला जन्म देईल, अशा गोष्टी कोणी करता कामा नये. राजकारणामध्ये बऱ्याच वेळा सवंग प्रसिद्धीसाठी किंवा अभिनिवेश म्हणून नेते, अशा प्रकारच्या वक्तव्य सार्वजनिक ठिकाणी करीत असतात. परंतु, यामधून निरपेक्ष चर्चा होणं गरजेचं आहे. कारण, भारतीय समाज हा १४० कोटी लोकांचा समाज आहे. १४० कोटी लोक ही एकच संस्कृती मानत नाहीत! त्यांच्या विभिन्न संस्कृती आहेत; परंतु, या देशाच्या लोकशाही संविधानाने एकमेकांच्या श्रद्धा, एकमेकांच्या निष्ठा एकमेकांच्या धर्माचा, एकमेकांच्या देवतांचा आदर करायला सांगितला आहे. शिकवले आहे. हा संवैधानिक संस्कार रुजणं, हे या सगळ्यांमागे फार आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी, धार्मिक पिठाने किंवा झुंडशाहीच्या संघटनात्मक पातळीवर अशा गोष्टी हिंसक पद्धतीने व्यक्त होण्यापेक्षा लोकशाही व्यवस्थेच्या मार्गाने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर व्यक्त होणे गरजेचे आहे. आमची लोकशाही ही आजही निर्दोष असणारी लोकशाही आहे. याची हमी देशाला आणि देशाच्या नागरिकाला आवर्जून देणे आजच्या काळात गरजेच आहे. हेच राजकीय विरोधकांसाठीही आणि सत्ताधाऱ्यांसाठीही भारतीयांचं खरं आव्हान आहे!

COMMENTS