Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीची प्रदूषणातून मुक्तता नाहीच

राजधानीतील हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीतनवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. वार्‍याची

राजधानीतील हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली
थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे गाड्यांना विलंब
राजधानीत धुक्यामुळे विमानसेवेला फटका

राजधानीतील हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. वार्‍याची दिशा बदलणे आणि त्यांचा वेग कमी राहिल्याने हवेतील घातक कण साचून राहिले असून, परिणामी हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ‘खराब’वरून थेट ‘अत्यंत खराब’ श्रेणीत घसरली आहे. सध्या ही स्थिती कायम असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.
एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टमच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 358 इतका नोंदवण्यात आला. हा निर्देशांक ‘अत्यंत खराब’ श्रेणीत मोडतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार राजधानीच्या अनेक भागांमध्ये प्रदूषणाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिल्लीतील विविध परिसरांचा विचार करता, आनंद विहार (425), चांदणी चौक (408), विवेक विहार (414) आणि द्वारका सेक्टर-8 (401) या भागांमध्ये प्रदूषणाचा स्तर अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. याशिवाय अशोक विहार, आर.के. पुरम, रोहिणी, वजीरपूर, जहांगीरपुरी आणि पंजाबी बाग या भागांमध्येही -टख 360 ते 390 दरम्यान नोंदवण्यात आला आहे. काही ठिकाणी, जसे की अलीपूर, बुरारी, आयजीआय विमानतळ टी-3 आणि लोधी रोड परिसरातही हवा ‘खराब’ ते ‘अत्यंत खराब’ श्रेणीतच आहे. या पार्श्‍वभूमीवर सीपीसीबीने असा अंदाज व्यक्त केला आहे की, रविवारपर्यंत हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारून पुन्हा ‘खराब’ श्रेणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र, दीर्घकालीन उपाययोजना राबविल्याशिवाय दिल्लीतील प्रदूषण समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

COMMENTS