सुनिल नारायणच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केकेआरने सीएसकेचा आठ गडी राखून पराभव केला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घे

सुनिल नारायणच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केकेआरने सीएसकेचा आठ गडी राखून पराभव केला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नारायणच्या नेतृत्वाखालील चमकदार गोलंदाजीमुळे सीएसके २० षटकांत ९ बाद १०३ धावांवर रोखले गेले. प्रत्युत्तरा दाखल नारायणने सलामीला येत शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या, ज्याच्या जोरावर केकेआरने १०.१ षटकात २ बाद १०७ धावा करत आरामदायक विजय नोंदविला.
सर्वाधिक वेळा आयपीएल जेतेपद मिळविण्यात मुंबई इंडियन्सबरोबर आघाडीवर असलेल्या सीएसकेने एका मोसमात सलग पाच सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावरील चेपॉकवर सलग तिसरा सामना गमावला आहे. केकेआरने फक्त ६१ चेंडूत विजयी लक्ष्य गाठले, जे आयपीएल मध्ये गाठलेले तिसरे सर्वात जलद लक्ष्य आहे. केकेआरसाठी कर्णधार राहाणे १७ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा करून नाबाद राहिला, तर रिंकू सिंगने बारा चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १५ धावा केल्या. सीएसकेकडून अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या शानदार विजयासह केकेआर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआरचे आता सहा सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुण आहेत. त्याचबरोबर सलग पाचव्या पराभवानंतर चेन्नईचा संघ सहा सामन्यांत एका विजयानंतर दोन गुणांसह नवव्या स्थानावर गेला आहे. गुजरात टायटन्स सध्या गुणतालिकेत अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने क्विंटन डी कॉक आणि नारायणच्या साथीने चांगली सुरुवात केली आणि दोन्ही फलंदाजांनी २५ चेंडूत ४६ धावा जोडल्या. तथापि, कंबोजने केकेआरला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक तीन षटकारांच्या मदतीने १६ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. यानंतर नारायणने आक्रमक खेळी करत केकेआरची धावसंख्या काही वेळात ८५ धावांपर्यंत पोहोचवली. नारायण अर्धशतक करण्याच्या जवळ होता पण तो नूरने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर केकेआरने रिंकू सिंगला फलंदाजीस पाठविले. त्याने कर्णधार अजिंक्य राहाणेसह संघाला विजयापर्यंत नेले. रिंकूने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला.
शिवम दुबेच्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर सीएसकेने केकेआरसमोर १०४ धावांचे लक्ष्य ठेवले. सीएसकेने आयपीएलमधील पहिल्या डावातील सर्वात कमी धावसंख्या पोस्ट केली. एवढेच नाही तर चेपॉक स्टेडियमवर आयपीएलमधील कोणत्याही संघाची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी याच मैदानावर सन २०१९ मध्ये आरसीबीविरूध्द सीएसके ७० धावांत गुंडाळला गेला होता.
सीएसकेकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने २९ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा काढल्या. जर सीएसके शंभरीचा धावांचा टप्पा पार करू शकला असेल तर त्याचे श्रेय शिवमला जाते. तो शेवटपर्यंत टिकून राहिला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांचे सलामीवीर १६ धावांवर माघारी परतले. सीएसके साठी कोणताही फलंदाज भागीदारी करू शकला नाही, ज्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. सीएसकेकडून विजय शंकरने २९, राहुल त्रिपाठीने १६ आणि डेव्हन कॉनवेने १२ धावा केल्या. त्याचवेळी पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, तर दोन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर पडल्यानंतर महेंद्र धोनी संघाचे नेतृत्व करत आहे. तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि सोळाव्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याला चार चेंडूत केवळ एक धाव करता आली. केकेआरसाठी नारायणने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दरम्यान, मोईन अली आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
एकंदर बघता सीएसकेसाठी हे आयपीएल सत्र एखाद्या वाईट स्वप्नासारखे सुरू आहे. खेळाच्या कोणत्याच क्षेत्रात संघ प्रभावशाली कामगिरी करताना दिसत नाही. शिवाय घरच्या मैदानाचा फायदा उठविण्यात ते अपयशी ठरत असल्याने पराभवाची अवदसा त्यांच्या मागे लागली असून परिस्थिती अशीच राहिली तर या मोसमात प्ले ऑफ मध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या चार संघात ते दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
COMMENTS