Homeताज्या बातम्याक्रीडा

वर्तमान क्रिकेटमधील वादग्रस्त घटना व त्यांचे पडसाद 

क्रिकेट हा मनोरंजनाने भरलेला सभ्यगृहस्थांचा खेळ गणला जातो. नुकत्याच भारतात संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत मनोरंजनाचा खजिनाच सर्वांसाठी खुला झाला होत

मनू, गुकेशसह 4 जणांना ’खेलरत्न’ तर स्वप्नील कुसाळे ’अर्जुन पुरस्कार’ने सन्मानित
आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर !
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक

क्रिकेट हा मनोरंजनाने भरलेला सभ्यगृहस्थांचा खेळ गणला जातो. नुकत्याच भारतात संपलेल्या विश्वचषक स्पर्धेत मनोरंजनाचा खजिनाच सर्वांसाठी खुला झाला होता. आनंदाने सर्व क्रिकेट रसिक, पंडितच नव्हे तर क्रिकेटचे टिकाकारही आनंदाने बेफाम झाले होते. परंतु या आनंदाच्या उधाणात वादग्रस्त घटनाही घडत असतात. त्यापैकी एक घटना श्रीलंका – बांगलादेश सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्याच्या बांगलादेश कर्णधार शाकिब अल हसनच्या अट्टाहासापायी दोन्ही देशाच्या संबंधात कटूता आलीच पण १४६ वर्षांच्या क्रिकेटच्या सहिष्णुतेलाही ठेच पोहोचली.

           विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची निराशजनक कामगिरी झाली. त्यानंतर तेथील क्रिकेटमध्ये मोठे बदल होणार हे उघड होतेच. संघाचे कोच, कर्णधार, निवड समिती व तिचा प्रमुख सगळे हटले किंवा हटवले गेले. मात्र या सर्वात वादग्रस्त घटना घडली की, तिच्या मुळे पाकिस्तानची निव्वळ क्रिकेट जगतातच नव्हे तर संपूर्ण जगात नाचक्की झाली. मुळातच वादग्रस्त घटनांतून निवड समिती अध्यक्ष बनलेल्या वेगवान गोलंदाज वहाब रियाझने आपला जुना मित्र व माजी कर्णधार सलमान बट याची प्रथम निवड समिती सदस्य व निवड समिती अध्यक्षाचा सल्लागार म्हणून निवड केली व चोवीस तासात आपला निर्णय फिरविला. त्याचे कारण म्हणजे सलमान बटच्या नेतृत्व काळात सन २०१० मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्डस कसोटीत स्पॉट फिक्सिंग प्रकरण घडले. त्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर व स्वतः कर्णधार सलमान बट सामील होते. चौकशी अंती त्या तिघांनाही शिक्षा झाली. कालांतराने आमिर पुन्हा पाककडून खेळला. मात्र वहाबने सलमान बटला निवड समितीत घेतल्याने पाकमध्ये भला मोठा गदारोळ झाला. अनेकांचं मत होतं की सलमान बट चुकीचा होता हे जगजाहीर असताना त्याला घेतलंच कसं ? मग घेतल्यानंतर लगेच काढलं का ? यामुळे पाकिस्तानची जगभर छी – थू  झाली.  एखाद्या गुन्हेगाराची सजा भोगून झाल्यास त्याला पुनर्वसन करण्याची संधी द्यायला पाहिजे. मात्र ते येथे होताना दिसले नाही. पाकिस्तान फक्त नावा पुरताच लोकशाही देश आहे. तिथे कायद्याचा देखील आदर केला जात नाही.  तेथे काचेच्या घरात राहाणारेच दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करण्याचे काम करतात.

              जागतिक क्रिकेटमध्ये आपल्याच देशांच्या क्रिकेटपटूं विरूध्द वादग्रस्त वागण्यात पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश अग्रेसर असताना त्यात कधी नव्हे ते ऑस्ट्रेलियाचे दोन मातब्बर खेळाडू माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन व विद्यमान सलामीवीर डेव्हीड वॉर्नर यांच्या दरम्यान तिखट शब्दांचा भडीमार झाला. मिचेल जॉन्सन त्याच्या कार्यकाळात नेहमीच आक्रमक वागण्यासाठी आघाडीवर असायचा मात्र येथे त्याला आपलाच माजी सहकारी डेव्हीड वॉर्नर विषयी मतप्रदर्शन करण्यावाचून राहावले नाही. सध्या पाकिस्तान संघ तीन कसोटींची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या मालिकेतील शेवटच्या कसोटीनंतर डेव्हीड वॉर्नर निवृत्त होणार आहे. त्याला फेअरवेल दिला जाणार आहे. जॉन्सनच्या मते वॉर्नरल विशेष फेअरवेल निवृत्ती देणे योग्य नाही. कारण ज्या कसोटी क्रिकेटमधून वॉर्नर निवृत्त होत आहे. त्या कसोटी सामन्यांमध्ये वॉर्नर मागील दोन वर्षांपासून सातत्याने अपयशी ठरत आहे. या दरम्यान तो केवळ दोनच कसोटी शतकं ठोकू शकला आहे व त्याच्या खात्यात मोठया धावाही नाहीत. या शिवाय सन २०१६-१७ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चेंडू कुरतडल्या (सँड पेपर) प्रकरणी तत्कालीन कर्णधार स्टिव्हन स्मिथ, उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर व कॅमरून बेन क्राफ्ट दोषी आढळले व त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलिया व आयसीसीने दोषी ठरवून दंड व सजा केली होती. हे सँड पेपर प्रकरण क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरण होते. त्यामुळे समस्त क्रिकेट जगतात नेहमी ताठ मानेने वावरणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शरमेने झुकावे लागले होते. त्या कारणास्तवही जॉन्सन वॉर्नरवर नाराज असून जॉन्सनने वृत्तपत्रांमधून आपल्या जहाल भावना व्यक्त केल्या. हे प्रकरण ऑस्ट्रेलिया बरोबरच जगभरही चर्चिले जाऊ लागले. एवढया मोठया रामायणानंतरही क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या निर्णयावर ठाम आहे. उलट एका चुकीच्या माणसाला सन्मानीत करण्याबद्दल आवाज उठविणाऱ्या मिचेल जॉन्सनलाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी असलेल्या टिव्ही समालोचकांच्या चमूतून वगळले. अंधेर नगरी चौपट राजा याचे हे मुर्तिमंत उदाहरणच आहे.

              विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असलेली न्युझिलंड व बांगलादेश यांच्यातील मालिका सुरू असून दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशिफिकुर रहीम याने काईल जेमीसनचा एक चेंडू तटवला परंतु त्यानंतर लगेचच तो चेंडू बॅट न पकडलेल्या हाताने अडवला. वास्तविक तो चेंडू स्टंप्सवर जातही नव्हता. मात्र खेळात असलेला चेंडू अडवल्यामुळे ” ऑब्स्ट्रक्ट टू फिल्ड” या नियमाखाली तिसऱ्या पंचाकडे प्रकरण गेल्यानंतर रहिमला बाद देण्यात आले. एरव्ही वादाला निमंत्रण देणाऱ्या बांगलादेशी खेळाडूंना हा घरचा आहेर मोठया वादग्रस्त प्रकरणांपेक्षाही भयंकर होता. 

              भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज एस.श्रीशांत यांच्यातील वादाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान दोघे आमने सामने आले.  सामन्या दरम्यानच दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला होता.  श्रीशांत वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही.  याआधीही तो अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी श्रीशांत पाच मोठ्या वादात अडकला आहे.  हरभजनसोबत आयपीएल दरम्यान वाद झाला होता. श्रीशांत सन २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता. मागच्याच महिन्यात केरळमधील स्पोर्टस अकॅडमी बरोबर १८ लाख ६० रूपयांच्या फसवणुकीचा गुन्हा श्रीशांतवर नोंदला आहे.

श्रीशांतने सन २०१८ मध्ये भारतातील प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. शो दरम्यान, तो अभिनेता करणवीर बोरासह त्याच्या स्पर्धकांसोबत भांडताना दिसला. त्याची एफआयआर नोंदही झाली.

                 श्रीशांतसह भांडणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा भाजपाचा दिल्लीतील एक विद्यमान खासदार आहे. तोही त्याच्या भडक व तापड स्वभावासाठी कुप्रसिद्ध आहे. तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहलीसह त्याचे आयपीएल स्पर्धे दरम्यान खटके उडाले आहेत. त्याचा हा भडकाऊपणा त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द वेळेआधीच संपण्यास कारणीभूत ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशीही त्याचे अनेकदा वाद झाले आहेत. विशेष म्हणजे श्रीशांत व गौतम गंभीर हे सन २००७ टि२० व सन २०११ च्या वनडे विश्वचषक विजेत्या टिम इंडियाचे सदस्य आहेत.

                  एकेकाळी केवळ सभ्य गृहस्थच क्रिकेट खेळायचे. परंतु आता खरेखुरे सभ्य लोक क्रिकेटमध्ये औषधापुरतेच शिल्लक राहिल्याने या लोकप्रिय खेळाचं गुन्हेगारीकरण नाही झाले तर देवच पावला असे समजावे.

लेखक – डॉ.दत्ता विघावे क्रिकेट समिक्षक. 

COMMENTS