मुंबई : राज्याचे राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. हे अवघा महाराष्ट्र पहात असून हे महाराष्ट्रातील आम्ही कुणीही सहन करणार नाही, असा इशा
मुंबई : राज्याचे राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. हे अवघा महाराष्ट्र पहात असून हे महाराष्ट्रातील आम्ही कुणीही सहन करणार नाही, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिला. राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विधीमंडळ परिसरात माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली. सध्या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान केल्याप्रकरणी वादात आहेत. तर हे सुरू असताना त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत अवमानजनक शब्द वापरुन औचित्याचा भंग केल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही गोष्ट राज्यपाल सातत्याने आणि जाणीवपूर्वक करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना केवळ गोंधळ घालण्यात स्वारस्य असल्याचे ॲड. ठाकूर म्हणाल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, भारतीय राज्य घटनेचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, असे दिसते. त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीला धक्का लावण्याचे काम सुरू आहे. त्यांना एवढंच करून थांबायचे नाही तर त्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची आहे. सत्तेत येण्यासाठी ही सारी धडपड सुरू असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
COMMENTS