Homeताज्या बातम्यादेश

कामगार, शेतकर्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष; देशव्यापाी संपावरून काँगे्रसचा हल्लाबोल

नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आणि प्रस्तावित व्यापार कराराच्या निषेधार्थ देशभरात काल देशव्यापी संप पाळण्यात आला. या संपाला का

बिनविरोधचा संशयकल्लोळ !
काँग्रेसच्या ‘खिचडी पॅटर्न’चा अन्वयार्थ!
भाजप कार्यकर्त्यांचे काँग्रेस मुख्यालयाबाहेर आंदोलन

नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आणि प्रस्तावित व्यापार कराराच्या निषेधार्थ देशभरात काल देशव्यापी संप पाळण्यात आला. या संपाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारवर कामगार आणि शेतकर्‍यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गुरूवारी केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या व्यापार करार, नव्या कामगार कायदे आणि मनरेगा योजना हिरावून घेण्याच्या धोरणांविरोधात देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका करत म्हटले की, कामगार आणि शेतकर्‍यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना त्यांच्या मतांना डावलले गेले. आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आवाजाकडे लक्ष देतील का, की त्यांच्यावर एखाद्या शक्तीची पकड अधिक मजबूत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाशी संबंधित कर्मचारी व कामगारांनी कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट-समर्थक धोरणांविरोधात एकदिवसीय संपाचे आवाहन केले होते. या संपात सुमारे 30 कोटी कामगार सहभागी झाला असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. हैदराबाद येथील व्हीएसटी परिसरात कामगार व शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मोठी सभा घेतली. देशभरातील अनेक शहरांत मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली. बिहारमध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कटिहार जिल्ह्यात कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने करत वाहतूक काही तासांसाठी ठप्प केली. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सीपीआय (एमएल) लिबरेशनशी संलग्न संघटनांनी विविध भागांत बंदच्या समर्थनार्थ मोर्चे काढले. सीपीआय (एमएल) चे सरचिटणीस डिपांकर भट्टाचार्य यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. नव्या कामगार संहितांमुळे कामगारांना उद्योगमालकांचे गुलाम बनवले जाईल, असा आरोप त्यांनी केला. तसेच मनरेगाच्या जागी आणलेल्या जीरामजी या योजनेमुळे ग्रामीण जनतेचा रोजगाराचा हक्क हिरावला जाईल, असे ते म्हणाले. अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार हा सापळा करार असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या हिताला धोका निर्माण होईल. आजवर आमचे शेतकरी अंबानी-अदानींसारख्या उद्योगपतींशी झुंज देत होते; आता त्यांना अमेरिकेशीही स्पर्धा करावी लागेल, असे ते म्हणाले. भट्टाचार्य यांनी बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवलेल्या एनडीए सरकारवरही टीका केली. बुलडोझर राजची छाया बिहारमध्येही दिसत असून मुख्यमंत्री नितीश कुमार परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना दिसत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

चौकट———
देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद
देशभरात सुरू असलेल्या या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी वाहतूक, शासकीय सेवा आणि औद्योगिक कामकाजावर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. कामगार-शेतकरी प्रश्‍नांवरून केंद्र आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS