केरळ सरकारमधील मत्स्यपालन मंत्री साजी चेरियन यांनी संविधानाविषयी गरळ ओकल्याने त्यांना पदाचा तडकाफडकी राजीनामा देणे भाग पडले. यावर प्रतिक्रिया देता
केरळ सरकारमधील मत्स्यपालन मंत्री साजी चेरियन यांनी संविधानाविषयी गरळ ओकल्याने त्यांना पदाचा तडकाफडकी राजीनामा देणे भाग पडले. यावर प्रतिक्रिया देताना चेरियन यांनी आपल्या विधानाचा माध्यमांनी विपर्यस्त अर्थ लावल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते कम्युनिस्ट नेत्यांना बदनाम करण्याची भूमिका माध्यमांची असल्याने त्यांनी माझ्या विधानांना मोडून तोडून प्रसिद्ध केले. अर्थात, एक वेळा चेरियन यांचा आरोप आपण खराही मानला तरी, जबाबदार पदावरील व्यक्तीने कोणतेही विधान करताना पूर्णपणे काळजीपूर्वक करायला हवे. साजी चेरियन हे काॅम्रेड आहेत. देशातील कम्युनिस्ट पक्ष कामगार आणि कष्टकरी जनतेचा कैवार घेऊन राजकारण करित असतात. कम्युनिस्ट पक्ष हे संसदीय राजकारणात असले तरी संसदीय राजकीय सत्ता हे त्यांचे ध्येय नाही. त्यांचे अंतिम उद्दिष्ट हे कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित करण्याचे असल्यामुळे सुप्त पध्दतीने त्यांचा संविधानाला विरोध असणारच, असा एक तर्क भारतीयांमध्ये रूजला आहे. चेरियन यांच्यावर जो आरोप करण्यात आला त्यानुसार त्यांनी भारतीय संविधान हे शोषकांना संरक्षण देते, असे विधान त्यांनी एका कार्यक्रमात केले. भारतीय घटना ही संविधान सभेच्या विद्वान सदस्यांच्या मसुदा समितीने तयार केलेल्या मसुदावर दीर्घ आणि सखोल चर्चा घडवून प्रत्येक आर्टिकल, अनुसूचीला अंतिम स्वरूप दिले गेले. घटना समिती आणि मसुदा समिती यांच्यात ज्या गंभीर चर्चा घडल्या त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. एवढ्या चर्चा घडूनही जेव्हा भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले गेले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला समर्पित आपल्या गंभीर आणि वैचारिक भाषणातून इशारा दिला होता की भारतीय संविधान हे जगातल्या अत्यंत उत्कृष्ट असे संविधान आहे. हे संविधान कितीही चांगले असले तरी त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा राबवणाऱ्यांच्या हातात आहे. घटना कितीही उत्कृष्ट असली तरी त्याचे राबविते धनी जर वाईट असतील तर घटनाही वाईट ठरण्याचा धोका आहे त्याचबरोबर घटना कितीही वाईट असेल आणि राबवणारे जर चांगले असतील तर ती घटनाही चांगली ठरते. संविधानाच्या विषयी हे परखड आणि अत्यंत सखोल वैचारिक भाष्य संविधान आणि त्याच्या जमेच्या बाजू भारतीय समाजासमोर स्पष्ट करतात! केरळचे मंत्री कॉम्रेड साजिचेरियन यांनी हे भाषण निश्चितपणे ऐकलेले असेल यावर शंका घेण्याचे कारण नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने संविधान हे शोषकांची बाजू घेतोय असे जेव्हा ठळकपणे मानतात तेव्हा संविधान समजून घेण्यात ते अपयशी ठरलेले आहे किंवा संविधानाविषयी त्यांच्या निष्ठा तीव्र नाहीण असा तरी याचा अर्थ निघतो. कम्युनिस्ट विचारधारा ही संसदीय लोकशाही पद्धतीच्या अनुकूल नाही, हे जाहीर सत्य आहे. कारण कम्युनिस्ट सत्तेचे विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांची हुकुमशाही म्हणूनच कायम केलेले आहे. परंतु, जेव्हा व्यक्ती वर्गामध्ये विचाराधीन होतो, तेव्हा, त्याचा सामाजिक प्रवर्ग हा बाद ठरवला जातो. परंतु, भारतीय समाज व्यवस्थेचे वास्तव असे की, येथील समाज हा जातीव्यवस्थाग्रस्त असल्यामुळे त्याचा संपूर्ण विचार हा वर्ग व्यवस्थेत करता येत नाही. त्यामुळे सामाजिक वास्तव पाहता मार्क्सवाद हा भारतीय समाज व्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगाचा ठरत नाही, ही या देशातील वस्तुस्थिती आहे आणि तेच सत्य आहे. अर्थात केरळ हे राज्य देशातील सर्वाधिक साक्षर आणि सामाजिक विचार असणारे राज्य आहे यावर आपला अजूनही विश्वास आहे. आर्थोडाक्स किंवा अतिशय एक्सट्रीम विचार ज्याला म्हणतो, तशा विचारांना केरळमध्ये स्थान नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. तरीही कॉम्रेड साजी चेरीयन यांनी असे विधान नेमके का केले असावे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
COMMENTS